मुंबई : ग्राहकांनी सावध राहण्याचे आवाहन
सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती दाखवून कमी किमतीत चेअर देत असल्याचा दावा करणाऱ्या काही संकेतस्थळांमार्फत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये IAFA Furniture या नावाखाली चालणाऱ्या वेबसाईटबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या वेबसाईटवरून ग्राहकांकडून ऑर्डर घेतली जाते. ऑर्डर करताना ₹300 ते ₹500 इतकी रक्कम COD (Cash on Delivery) किंवा बुकिंग चार्जच्या नावाखाली आधीच वसूल केली जाते. मात्र, ऑर्डरनंतर अनेक दिवस झाले तरी माल पोहोचत नाही. ग्राहक फॉलोअपसाठी संपर्क साधल्यास, “तुमच्या भागात सर्व्हिस बंद आहे” असे कारण सांगून टाळाटाळ केली जाते.
विशेष म्हणजे, दैनिक चालु वार्ता या वृत्तपत्र कार्यालयासाठी याच वेबसाईटवरून चेअर्स मागवण्यात आल्या होत्या. मात्र, ठरलेल्या कालावधीत ना माल मिळाला, ना समाधानकारक उत्तर देण्यात आले. त्यामुळे ही केवळ वैयक्तिक तक्रार नसून, संघटित पद्धतीने अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा संशय बळावला आहे.
ग्राहकांनी अशा प्रकारच्या आकर्षक पण संशयास्पद ऑनलाईन ऑफर्सपासून सावध राहावे. कोणतीही ऑर्डर देण्यापूर्वी कंपनीची विश्वासार्हता, संपर्क क्रमांक, भौतिक पत्ता व आधीचे ग्राहक अनुभव तपासावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
📢 सूचना: अशा फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्सविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकांनी सायबर क्राईम विभाग किंवा ग्राहक संरक्षण मंचाशी संपर्क साधावा.
