ठाणे (30) : आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व नियमबद्ध रितीने पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध तक्रारींचे तात्काळ निवारण व्हावे, या उद्देशाने हा कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी +919152817252 दूरध्वनी क्रमांकावर किंवा tmcelectiongrievance@thanecity.gov.in ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन, बेकायदेशीर प्रचार, भिंतींवर पोस्टर्स-बॅनर्स लावणे, मतदारांवर दबाव, पैशांचा किंवा वस्तूंचा गैरवापर, खोटी माहिती पसरवणे, मतदान प्रक्रियेशी संबंधित अडचणी, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांविषयीच्या तक्रारी याबाबत नागरिक या तक्रार निवारण कक्षात संपर्क करू शकतात. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन त्यावर तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
तक्रार निवारण कक्षात प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून संबंधित विभाग, क्षेत्रीय अधिकारी, पोलीस प्रशासन व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तक्रारींचे वेळेत निराकरण केले जाणार आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती गोपनीय ठेवली जाणार असून नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी नोंदवाव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून स्वच्छ, मुक्त व निष्पक्ष निवडणूक पार पाडण्यासाठी नागरिकांनी या तक्रार निवारण व्यवस्थेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
