उत्तर कोरियाने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांसह विविध नवीन शस्त्रप्रणालींच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने ‘क्लस्टर-बॉम्ब’ युद्धसामग्रीने सज्ज असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश असून, हे शस्त्र ६.५ ते ७ हेक्टर क्षेत्रातील कोणत्याही लक्ष्याचा विनाश करण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्योंगयांगच्या सरकारी माध्यमांनुसार, तीन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत विमानविरोधी शस्त्रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रणाली आणि कार्बन-फायबर बॉम्बची प्रात्यक्षिके करण्यात आली. ही क्षेपणास्त्रे रशियाच्या ‘इस्कंदर’ क्षेपणास्त्रांप्रमाणेच कमी उंचीवरून दिशा बदलून उड्डाण करू शकतात, ज्यामुळे शत्रूची क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा त्यांना शोधण्यात अपयशी ठरू शकते.
दक्षिण कोरियाच्या लष्कराने या आठवड्यात उत्तर कोरियाने (North Korea) अनेक क्षेपणास्त्रे डागल्याची पुष्टी केली आहे. उत्तर कोरियाचे उपमंत्री जांग कुम चोल यांनी दक्षिण कोरियाला पुन्हा एकदा “कट्टर शत्रू राष्ट्र” संबोधले असून, चर्चेसाठी प्रयत्न करणाऱ्या सेऊल प्रशासनाची खिल्ली उडवली आहे. अमेरिकेसोबतची अणुचर्चा निष्फळ ठरल्यापासून किम जोंग उन यांनी आपली शस्त्रे विकसित करण्यावर आणि रशिया-चीनशी संबंध अधिक घट्ट करण्यावर भर दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी गुरुवारी प्योंगयांगच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. जपान आणि अमेरिकेने या चाचण्यांमुळे सध्या कोणताही तातडीचा धोका नसल्याचे म्हटले असले, तरी या भागातील तणाव कमालीचा वाढला आहे.
