दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- विद्यमान सरकारने दोन वर्षात राबविलेल्या विविध विभागाच्या विकासात्मक योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची’ राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाला विद्यार्थी,युवक तसेच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरु असून ते दि.५ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
शासनाने राबविलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी या प्रदर्शनात शिक्षण,कृषी,पर्यावरण,जलसिंचन,क्रीडा,आरोग्य,नागरी सुविधा,सामाजिक न्याय,आदिवासी विकास,वस्त्रोद्योग,रस्ते,वीज,कला संस्कृती संवर्धन आदी विविध क्षेत्रांतील विकासात्मक योजनांच्या माहितीचा समावेश आहे.शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह विद्यार्थी व युवकांचा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाचे संकट झेलूनही राज्य सरकारने नागरिकांसाठी विविध क्षेत्रांत राबवलेल्या योजना व कामे यांची माहिती प्रदर्शनात बघायला मिळाली. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना हितकारक व उपयुक्त आहेत,अशी प्रतिक्रिया श्री शिवाजी महाविद्यालयाचे डॉ.कुमार बोबडे यांच्यासह विविध विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.महाविकास आघाडीची दोन वर्षे प्रगतीची असून उल्लेखनीय कामगिरी प्रदर्शनाद्वारे जाणून घेता आली,अशी प्रतिक्रिया आयटीआय निर्देशक रेखा पाटणे यांनी दिली.
विद्यार्थी व तरूणांसाठी,तसेच तळागाळातील घटकांसाठी शासन कितीतरी स्तरांवर काम करते,याची माहिती या प्रदर्शनातून मिळाली,अशी प्रतिक्रिया विद्यार्थीनी रुपाली भांगे हिने व्यक्त केली.शासनाने विविध विभाग,त्यांच्या योजनांची अचूक आकडेवारीसह ठळक व उपयुक्त माहिती प्रदर्शनातून जाणून घेता आली अशी प्रतिक्रिया प्रज्वल बानाईत या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
