दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – राज्यातील आगामी राजकीय समीकरणाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणेश दर्शनासाठी जाणार आहे.
तत्पूर्वी मनसे-शिंदे गट युतीच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये झळकू लागल्या आहेत. मनसे-शिंदे गटाकडून युतीबाबत कुठलीही अधिकृत भूमिका मांडण्यात आली नाही. परंतु दोन्ही बाजूने थेट नकारही कुणी दिला नाही. आता या चर्चेवर भाजपाकडून प्रतिक्रिया आली आहे.
पत्रकारांनी युतीबाबत प्रश्न विचारला असता राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमची पतंगबाजी मी पाहतो तेव्हा मलाही खूप मज्जा येते. ज्याला जे मनात येईल ते दाखवतो. ज्याला जे विश्लेषण करायचं तो ते करतो. भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना जी एकनाथ शिंदेंसोबत आहे आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि आम्ही मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही झोकून देता त्यावेळीस ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ मुंबई महापालिकेपुरतं नव्हतं तर ते एकूणच निवडणुकीच्या रणनीतीबद्दल होते. भाजपा मिशन भारत आहे, महाराष्ट्रा भाजपाचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
