दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””‘””””””””””””””””””””””””””””””””””””
चाळीस वर्षांपूर्वी ज्या ध्येयपूर्तीसाठी विवेक पंडित (भाऊ) आणि त्यांची धर्मपत्नी, अर्धांगिनी विद्युल्लता पंडित यांनी श्रमजीवी संघटनेची स्थापना केली, तो दिवस होता सन १९८२ च्या १९ ऑक्टोबरचा. त्यांची ती ध्येयपूर्ती नक्कीच साध्य झाली असं म्हणायला मुळीच हरकत नाही. कारण त्या काळी आदिवासी, श्रमजीवी, कष्टकरी यांना कोणाचाच यत्किंचितही आधार नव्हता. पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी अल्पशा मोबदल्यात मिळेल ते काम, मिळेल तेथे आणि मिळेल तेव्हा या समाजाकडून करवून घेतलं जायचं. मग त्यासाठी वर्ष वर्ष काहीच मोबदला न घेता अगदी लहान लहान पोरांनाही राब राब राबवले जायचे नव्हे त्यांना दंडेलीने, जबरीनेच राबवून घेतले जायचे. प्रसंगी वीट भट्टी मालक या भोळ्या भाबड्या समाजाला प्रसंगी बेदम मार द्यायचे. कित्येकदा दिवस दिवस बांधून ठेवायचे. कधी कधी तर अज्ञात जागी लपवूनही ठेवायचे. त्यांची उपासमार करायचे. अशाप्रकारचा अन्याय, अत्याचार, घोर अपमानजनक वागणूक याच मालकांकडून श्रमजीवींना सोसावी लागत असे. महिलांना त्या काळी दिवस दिवस उपाशी पोटी थांबावे लागत असे. तोंड दाबून बुक्यांचा मार, अशी दयनीय अवस्था या समाजाची त्या काळी होत होती. वीटभट्टी मालकाशिवाय अन्य कोणीच दाता नसल्यानचे चित्र त्या वेळी श्रमजीवींमध्ये भासवले जायचे. वर्ष वर्ष आधीच मामुली (बोटावर मोजण्याइतपत) रकमा देऊन या सर्वसामान्य
गोरं गरिबां कडून कोऱ्या बॉंडवर लिहून घेतले जायचे व त्या बदल्यात यांना वर्षानुवर्षे राबवून घेतले जायचे. कदाचित यालाच वेठबिगारी म्हणत असावेत.
अशा भयान व बेकार परिस्थितीत जखडलेल्या या समाजाला कोणीही वाली नव्हता. त्यांची समस्या ऐकणारा कोणीही नव्हता. त्यांना न्याय मिळेल का नाही, याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचा आक्रोश ऐकणारे या धर्तीवर त्यावेळी कुणीही नव्हते. किंबहुना त्याचाच गैरफायदा घेत या समाजाला मग्रुर वीटभट्टी मालक वेठीस धरुन त्यांचे कमालीचे हाल हाल करीत असत. नेमकं हेच मर्म ओळखून विवेक पंडित नावाच्या एका तरण्या बांड युवकाने या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचे स्वप्न उराशी बाळगले असावे. यश येईल किंवा नाही, या समाजाला न्याय मिळू शकेल का नाही, आपल्या प्रयत्नांमुळे त्यांच्या हाती काही पडू शकेल का नाही अशा नानाविध प्रश्नांची उकल होईल कां नाही याची यत्किंचितही तमा न बाळगता एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या विवेक पंडित यांनी अगदी मागचा पुढचा नव्हे नव्हे कशाचाही विचार न करता, हातावर पोट असलेल्या या वंचित समाजाला न्याय मिळवून द्यायचाच या जिद्दीने पंडित दाम्पत्य हे कामाला लागले होते.
प्रारंभी मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या विवेक पंडितांचे आयुष्य नि भविष्य नेमके काय असावे याचा कोणताही अंदाज न आलेल्या त्या काळच्या ज्योतिषांना कालांतराने मात्र नक्कीच उलगडा झाला असावा. पुर्वीचे नि आताचे पंडित दाम्पत्य यातील फरक तो काय ? हे कोणीच नाकारू शकणार नाही. काखेत झोळी अटकवलेले तारुण्यातील विवेक पंडितांनी आपले उभे आयुष्य जणू पणालाच लावले होते. ते गोरेगाव पासून सायकलवर सतत उन्हात तान्हात फिरत असायचे. यांचा प्रत्यक्ष प्रत्यय माझ्या नजरेस आला नसला तरी तसा बोलबाला मात्र त्या काळी सर्वत्र असल्याचे वास्तव चर्चेतून कळले जायचे. अंगात लांब ढगला सदरा नि पायजमा व पायात चप्पल. जमले तर डोक्यावर कधी कधी टोपी सुध्दा असायची ज्यामुळे उष्माघातापासून बचाव करणे शक्य व्हायचे. गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली ते थेट वसई-विरार दरम्यानच्या कड्या- कपारी, डोंगर-दऱ्यातून विवेक पंडित यांची भटकंती असायची. श्रमजीवी, कष्टकरी नामक हा वंचित समाज जेथे काम मिळेल तेथेच स्थायिक होत असे. अशा अत्यंत अडचणीच्या व अडगळीच्या जागा अशक्य असले तरी विवेक पंडित दिवसभर पिंजून काढायचे. त्यांच्याशी संवाद साधायचे. समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. कित्येकजण मालकाच्या त्रासामुळे सांगण्यास धजावत नसत. तरीही त्यांना धीर देण्याचे व भविष्य तुमच्यासाठी नक्की चांगले आहे, हे पटवून देण्यासाठीचे प्रयत्न ते सतत करीत असत. तरीही म्हणावं असं यश विवेक पंडित यांच्या पदरी पडत नसे. तरीही विवेक पंडित याविषयी कधीच हताश न होता प्रयत्नांती परमेश्वर म्हणून सतत आपल्या कार्यावर विश्वास ठेवत असत. एक ना एक दिवस निश्चितपणे आपल्या कार्याला यश मिळू शकेल जणू याचीच खात्री त्यांना वाटल्यावाचून राहात नसावी. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि साने गुरुजींच्या प्रभावाची प्रखर चळवळ नसानसातून भिनलेल्या पंडित यांचा विवेक शांत बसेल तर ते कसले मुशीतले कार्यकर्ते समजायचे ? जणू हा पिंडच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जन्मला असावा. त्या काळी एका एका सदस्याची मनधरणी करावी लागत होती परंतु आज घडीला मात्र त्याच संस्थेच्या सदस्यांची संख्या तब्बल एक लाख ते तीस हजारांच्याही पुढे गेली आहे. याचाच अर्थ रोपटं लावायला कधीकाळी जागा न मिळणाऱ्या संस्थेचा आजमितीला मात्र चक्क वटवृक्ष बनला गेला आहे. पंडित दाम्पत्यांच्या प्रयत्नांना आलेले भरीव यश पहाता “विवेक-विद्युलता उद्यमी रत्नांची, श्रमजीवी झाली वय वर्ष चाळीशीची” असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.
विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या बांधणीसाठी सुरुवातीला जसा सायकल प्रवास व त्यांचे सातत्य कायम ठेवले तसेच त्यांच्या अर्धांगिनी विद्युलता पंडित यांनी सुध्दा आदिवासी पाड्यातील, गावखेड्यातील आदीवासी मुलांचे खेळ घेऊन त्यांच्यात एकोपा, स्फूर्ती, छंद निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले होते. त्यावेळी त्या खेळांमध्ये सामील न होता लांबून बघणाऱ्यां चीही कांही मुलं आढळून यायची. तेव्हा त्यामागील कारण जाणून घेतले असता सभोवताली उभी असलेली ती मुलं सालगडी असल्याचे समजले. त्यांचं वय खेळायचं, बागडायचं, शिक्षण घ्यायचं होतं. तथापि कोवळ्या वयातच काबाडकष्ट करून त्यांच्या वाढत्या वयाला अडवणूकीचा बांध घालण्यासारखा तो प्रकार म्हणजे ओझ्याखाली वाढते वय दाबण्यासारखे होय. अर्थात त्या मुलांचाही त्यात काही दोष नसला तरी त्यांच्या आई-वडिलांनी पोटाची खळगी भरण्यासाठी वीटभट्टी मालकांकडून उचललेल्या अगाऊ रकमेच्या मोबदल्यात मुलांना तब्बल अठरा अठरा तास राबावे लागत होते. हीच ती वेठबिगारी मोडीत काढण्यासाठी विवेक पंडित यांनी कमालीचा लढा उभारला होता. तीव्र आंदोलन छेडून प्रसंगी मालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना गजाआड करण्यासही भाग पाडले. वेठबिगार मुक्तसाठी प्रखर आंदोलने छेडली. त्याचाच परिपाक म्हणून वीटभट्टी मालकांनी विवेक पंडित यांच्यावर अनेकदा हल्लेही केले. त्यांची झळ सोसावी लागली तरी पंडित यांनी कामगार युक्तीचा तो लढा निर्धाराने पुढे रेटत अखेर शासनालाही तो कायदा करणे भाग पाडले. ज्यामुळे श्रमजीवी कामगार मालकाच्या वेठबिगारी तून कायमचा मुक्त झाला आहे. त्यात अनेक मालकांना शिक्षा झाली. महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. मालकांच्या या प्रथेला कायमची तिलांजली देण्यासाठी विवेक पंडित यांच्या या लढ्याला भरीव यश मिळाले. ज्यामुळे आजमितीला सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त कामगार जाचक वेठबिगारीतून मुक्त झाले आहेत.
पहिल्या लढ्यात आलेले भरीव यश पहाता ही चळवळ भविष्यातही अत्यंत आक्रमक बनविण्यावर पंडित यांनी अधिक भर दिला. देशाच्या विविध राज्यांत व नेपाळमध्ये जाऊन पंडित यांनी वेठबिगारीतून कामगार मुक्तीचे प्रशिक्षण अवगत केले ज्यांचा फायदा त्यांनी राज्य व देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र आंदोलन छेडून बंदीस्त कामगारांना वेठबिगारी तून कायमची मुक्तता मिळविण्याचे यश पदरी पाडून घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या लढ्यातून मिळालेल्या यशामुळे पंडित यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार सर्वश्रुत आहे. पुढे त्यांनी शेतमजूरांच्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेल्या लढ्यात किमान वेतनाचा कायदा लागू करावा म्हणून जे रान पेटवले तेही नसे थोडके. सुमारे १४ दिवसांचा संप पुकारुन शेतमजूरांना मजूरी नाही वाढली तर कामावरही असा इशारा देत कामावर जाणेच बंद केले होते. एवढ्यावरच न थांबता प्रत्येक गावातील शेतमजूरांनी गावात फेऱ्या काढून मजूरी वाढविण्याबाबत ची चळवळ अधिक तीव्र करणे, संप पुकारणे आदी प्रकार सुरुच ठेवले होते. त्याचाच परिपाक म्हणून शेतमजूरांवर हल्ले सुध्दा झाले होते. वेढेपाडा गावात तर तीव्र आंदोलन छेडले म्हणून ३०० स्त्री-पुरुष कामगारांना सात दिवस जेलची हवा खावी लागली होती. त्यालाही न डगमगता सर्वजण सामोरे गेले. त्यांची फलश्रुती म्हणून किमान वेतनाचा कायदा लागू झाला. त्या अनुषंगाने वाढलेली बाकी तफावत शेवटी शेतकऱ्यांकडून शेतमजूरांना देणे भाग पडले. हां दुसरा विजय सार्थकी ठरला. त्याशिवाय सिद्धपिठ-गणेशपुरी येथील मजूरांसाठी किमान मजूरीसाठीचा लढा उभारुन संघटनेने फुंकलेले रणशिंग अखेर फायदेशीर ठरले. वीट भट्टी मालकांकडून कामगारांची होणारी घोर फसवणूक आणि सुट्टीवर कामगारांचे होणारे मृत्यू याविषयी दिलेल्या लढ्यात कामगारांना न्याय मिळवून दिला व मजूरी सुध्दा वाढवून देण्यासंबंधीचे यश मिळाले. ही विजयाची पाचवी शृंखला म्हणावी लागेल.
वसई-विरार उपप्रदेशातील दडपशाही व गुंडगिरीविरोधात श्रमजीवी संघटनेनं दिलेले अनेक लढे यशस्वी व ऐतिहासिक ठरले. भूमाफियांच्या व दहशतीच्या नावावर मुजोर अधिकारी श्रमजीवींकडून दडपशाहीने लाचेच्या स्वरुपात घेतलेल्या रकमा परत मिळवण्याचे महत्प्रयासी काम विवेक पंडित व विद्युल्लता पंडित यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी ठरले गेले. दिवसेंदिवस वाढणारी त्या भागातील दहशत व हुकुमशाही लक्षात घेता त्याविरुद्ध आणि प्रशासकीय स्तरावर निर्माण समस्यांचा निपटारा करण्यासाठी संघटनेतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रशिक्षित करण्यासाठीचे केंद्र चालविले गेले. प्रखर लढे उभारले गेले. एका बाजूला दहशती कारवाया तर दुसऱ्या बाजूला कायद्याचे प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते असा जंगी सामना तर विवेक पंडित यांची कायदेविषयक ढाल प्राप्त संघटनेचे बहुतांश लढे यशस्वीच ठरले गेले. ज्यामध्ये किमान वेतन, लाटलेल्या जमिनी परत मिळविणे, वीटभट्टी कामगारांची वेठबिगारी तून मुक्तता, वीटभट्टी कामगार विरोधी लढा, शासकीय योजनांमध्ये वाढीस लागलेल्या भ्रष्टाचार विरोधी लढा, बळकावले ल्या वनजमिनी भुमाफियांच्या तावडीतून मुक्त करण्याविषयीचा लढा असे एक ना अनेक लढे उभारुन संघटनेने दहशतवादी कारवाया आणि प्रशासकीय स्तरावरील मग्रूर यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठीचे भरीव काम केले.
विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना रेती उत्खनन विरोधात संघटनेने उभारलेला लढा मोठ्या प्रमाणात गाजला गेला. अर्ज विनंत्या करुनही मग्रूर शासन न्याय देत नाही याचा अंदाज येताच विवेक पंडित यांनी लाखोंच्या संख्येने थेट मंत्रालयावर पायी मोर्चा काढून शासनाला दणका दिला. मंत्रालयात घुसून विवेक पंडित यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनातच विलासराव देशमुख यांना घेराव घालून ती मागणीही यशस्वी केल्याचे सर्वश्रुत आहे. कदाचित या प्रकरणामध्ये राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनाही विवेक पंडित यांच्या मोर्चाची दखल घ्यावी लागली होती.
विविध मागण्या न्याय्य मार्गाने पदरात पाडून घेण्यासाठी संघटनेला कधी ठाणे जिल्हाधिकारी तर कधी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर ही अनेकदा भव्य असे मोर्चे काढावे लागले आहेत. लाखोंच्या संख्येतील आदिवासी, श्रमजीवींची ताकद आणि विवेक पंडित यांचे कायदेविषयक कुशल नेतृत्व केवळ वसई-विरारसह ठाणे, पालघर हे जिल्हेच नव्हे तर मुंबई, मंत्रालय म्हणा किंवा सातारा, पूण्यातील जाहिर सभा म्हणा, या त्या त्या भागातील सत्तास्थानांना व प्रसंगी शासनालाही जबरी हादरे देण्यात कुठेच कमी पडले नाहीत.
वसई-विरारमधील २९ गावांच्या महापालिकेतील समावेशाचा लढा तर संपूर्ण देशात गाजला गेला होता. तो विषय अजूनही न्यायप्रविष्ट असल्याने प्रलंबित राहिला आहे. त्या अनुषंगाने उभारलेला तीव्र लढा म्हणजे विरारच्या दहशतीखाली वावरणारे शासन प्रशासन यांचा इरसाल नमुनाच म्हणावा लागेल. उपोषणाच्या वेळी विवेक पंडित, पदाधिकारी व हजारो श्रमजीवी, आदिवासी बांधवांवर निर्दयपणे करण्यात आलेला लाठीचार्ज म्हणजे मोठा निंदनीय प्रकारच असल्याची टीका सर्वत्र वर्तविली जात होती.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत विवेक पंडित यांनी वसई मतदार संघातून मिळवलेले यश बरेच काही सांगून गेले. दरम्यानच्या काळात घडलेल्या अनेक राजकीय घडामोडी, महापालिका निवडणूकीत तब्बल २१ नगरसेवकांनी मारलेली विजयाची मुसंडी, तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायती व पंचायत समिती मधील सत्तेचा सारीपाट सत्ताधारी मंडळींच्या जबड्यातून कसा पलटविला होता हे समस्त पालघर-ठाणेकर अजूनही विसरलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुध्दा १३ पैकी ११ ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळवून विवेक पंडित यांनी तीच उर्जा व तीच ताकद कायम असल्याचे स्थानिक सत्ताधारी मंडळींना पंडित यांनी दाखवून दिले आहे.
मधल्या काळात युती सरकारने विवेक पंडित यांचा आदिवासी बांधवांविषयी असलेला प्रगल्भ अभ्यास ध्यानी घेऊन त्याविषयी स्थापित समितीचे अध्यक्षपद पंडित यांचेकडे सोपविले होते. अर्थात तशा समितीची मागणी विवेक पंडित यांनीच शासनाकडे केली होती. त्या मागणीला यश येवून समितीवर केलेले अभ्यासपूर्ण काम बघून शासनाने विवेक पंडित यांना राज्यमंत्र्यांच्या दर्जा देत श्रमजीवींच्या कल्याणासाठी अधिक दर्जेदार काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
अधिवेशन काळात अभ्यासपूर्ण अशा माहितीचे विश्लेषण आणि अंदाजपत्रकीय विवरण महाराष्ट्र विधीमंडळाला पुरविणारे विवेक पंडित यांची समर्थन नावाची संस्था खूपच अग्रेसर आहे. त्या संस्थेच्या आणि विधायक संसद नामक पंडित यांच्या खासगी संस्थेच्या सहाय्याने विवेक पंडित यांनी आदिवासींसाठी कार्यरत या विशेष समितीच्या माध्यमातून समाज उत्थानासाठी केलेले कार्य म्हणजे आदिवासींसाठी ते एक दिव्य स्वप्नच म्हणावे लागेल. त्याचीच फलश्रुती म्हणून राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विवेक पंडित यांना राज्यमंत्रीपदात बढती देऊन पूर्ण मंत्रीपद बहाल केले आहे. त्या रुपाने विवेक पंडित यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विवेक पंडित आमदार झाले तेव्हापासून श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनी विद्युल्लता पंडित या सांभाळत आहेत. श्री. पंडित यांच्या खांद्याला खांदा लावून प्रारंभीपासूनच कार्य करणाऱ्या ताई श्रमजीवींच्या सर्वांगीण विकासाचा गाडा अगदी नेटाने व अभ्यासपूर्ण हाताळत आहेत. एका नाण्याच्या दोन बाजू आणि संस्थेच्या विकासात्मक डोलाऱ्याचा रथ सुयोग्य असा चालावा यासाठी आवश्यक असणारी दोन प्रगल्भ नेतृत्वाची चाकं म्हणजेच विवेक पंडित व विद्युल्लता पंडित यांच्या रुपाने कटिबद्धरित्या कार्यरत आहेत.
विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित म्हणजेच श्रमजीवी संघटना असे समिकरण झाले आहे. मागील चाळीस वर्षांपासून नेटाने, जिद्दीने, धैर्याने आणि चिकाटीने ही संस्था चालवून या पंडित दाम्पत्याने संघटनेतील प्रत्येक सदस्यांचा एक घटक म्हणून जो विकास केला आहे, त्या प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार मिळवून दिला आहे, कायद्याचा अधिकार ज्ञात करुन दिला आहे, वेठबिगारी तून कायमची मुक्ती मिळवून दिली आहे, किमान वेतन व हक्क काय आहेत, यांचाही मनाजोगा लाभ मिळवून दिला आहे. अशा या “विवेक-विद्युलता उद्यमी रत्नांची, श्रमजीवी झाली हो, आता तब्बल चाळीशीची” असे गर्वाने, अभिमानाने सांगावेसे वाटते, यात तिळमात्र शंकाच नसावी.
