दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यात भरधाव वेगाने वाहने चालवून कायदा व वाहतुक नियम धाब्यावर बसवून पोलिसांनाही न घाबरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढीस लागली आहे परिणामी आपल्या किंवा अन्य दुसऱ्यांच्या जीवावर बेतले जाईल याचा कोणताही दूरगामी विचार न करता भरधाव वेगात अगदी बेफाम गाड्या चालविल्या जातात. त्याचाच परिपाक म्हणून जिल्हाभरात दिवसाकाठी अनेक ठिकाणी अपघात होऊन त्यात कित्येकांचा मृत्यू होत असतो तर कांहीजण गंभीर जखमी होतात. परभणी जिल्ह्यात काल झालेल्या विविध अपघातांमध्ये पाच जण ठार झाले आहेत. त्यात कांहीं घटनास्थळी तर कांहींचा अपघातानंतर उपचारावेळी मृत्यू झाले आहेत तर तीघेजण गंभीरावस्थेत जखमी आहेत. अपघाती मृत्यूची ही संख्या अत्यंत चिंताजनक असून यामुळे कित्येक घरे उजाडली जात आहेत. याला आळा बसला जाणे काळाची गरज असून केवळ वाहतूक पोलीसच नव्हे तर कर्तव्यावरील सर्वच पोलिसांनी सतर्क राहून अशा बेफाम वाहने चालविणाऱ्या महाभाग वाहनधारकांना वेळीच रोखून त्यांना कायद्याचा इंगा दाखवण्याची खरी गरज आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एक महिला अधिकारी असून घरावर किंवा परिवारावर जर एखादे अपघाती संकट कोसळले तर त्याचा किती विपरीत परिणाम होतो, यांची त्यांना पूर्ण जाणीव असू शकते. या सर्व गंभीर बाबींचा विचार करुन अधीक्षक महोदयांनी अशांचे जीव वाचवता यावेत यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

भरधाव वेगाने वाहने चालविणे हे नियमबाह्य व अपघातजन्य असले तरी त्यांचा गांभीर्याने कोणीच कसे विचार करीत नसावेत ? पोलिसांनाही नियंत्रण ठेवणे वा तसे नियंत्रण आणणे आवाक्याबाहेरचे आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत पोलीस बळ सुध्दा अत्यंत अपूरे आहे, हे कोणीच नाकारु शकणार नाही. तथापि आवाक्याबाहेरची बाब असली तरी अशा बेफाम वागण्यामुळे कित्येकांचे जाणारे जीव वाचू शकतील. उध्वस्त होणारे संसार वाचले जातील. घरे आणि परिवारांवर कोसळली जाणारी संकटं टळली जातील. कित्येक आया-बहिणींचे कुंकू साबित राहू शकेल. असं झाल्यास त्याचं सर्व श्रेय आणि पूण्य केवळ आणि केवळ पोलीस बांधवांनाच मिळणार आहे यात तिळमात्र शंकाच नसावी. आपल्या घरावर असे संकट येऊ नये, अशी भावना प्रत्येकाची असली पाहिजे. एक-दोन दिवसांत जर ५-६ माणसं (मग त्यात तरुण असो वा वयस्कर) दगावली जात असतील आणि तीही केवळ अपघातांमुळे, तर ही बाब अत्यंत चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.

परभणी शहरातील वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डींग समोर एका सेवा निवृत्त शिक्षकाला आपला प्राण गमवावा लागला. तालुक्यातील दैठणाजवळ कार-ॲटोचा अपघात होऊन त्यात तीघेजण गंभीर जखमी झाले. तिसऱ्या घटनेत खैरी पाटी येथे दुचाकीचा अपघात होऊन त्यात ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. चवथ्या घटनेत पाद्री-माजलगाव रोडवर आष्टी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पाचव्या अपघातात सेलू तालुक्यातील डोंगरगाव टाकीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३२ वर्षीय तरुणी जागीच ठार झाला आहे तर सहाव्या घटनेत सेलू तालुक्यातील भारस्वाडा जवळील दुचाकी-ट्रॉली अपघातात एकाचा मृत्यू झाला असून त्याची नोंद दैठणा पोलीस ठाण्यात असल्याचे समजते.
अशा चिंताजनक अपघातांना पोलिसांचे दूर्लक्ष कारणीभूत असल्याचे कालच्या वृत्तांकनात जरी म्हटले असले तरी आणि अपघातांना पोलिसांकडूनच आळा बसला जावा असे जरी वाटले तरी भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या ची पण काही नैतिक जबाबदारी असू शकते का नाही, याचाही पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येकांनी आपली नैतिक मूल्ये जपली तर अशी वेळच मुळी येऊ शकणार परंतु परिणामांची कोणतीही तमा न बाळगणाऱ्या बेजबाबदार आणि जीव टांगणीला लावणाऱ्यांमुळेच अशी परिस्थिती निर्माण होत असते. म्हातारी मेल्याचे दु:आ नाही परंतु काळ सोकावता कामा नये, याची जाणीव ठेवून नव्हे मानव धर्म जीवंत राहिला जावा यासाठी कायद्याच्या ही पुढे जाऊन पोलीस बांधवांनी वरिष्ठांच्या परवानगीने ही मोहीम राबविणे काळाची गरज ठरणारी आहे. असे केले आणि कायद्याचा कठोर वापर करुन अशा महाभागांना आळा घालण्याचे महत्प्रयासी काम केले तर त्यांच्या परिवारातील एक घटकच वाचला जाईल असे समजायला मुळीच हरकत नाही. पोलीस अधीक्षकांनाही त्यांचे पूत्र लाभले जाईल. आया-बहिणी निश्चितच आशीर्वाद देतील एवढा तरी आशावाद व्यक्त करायला हरकत नाही.
सखाराम हरकळ यांना बाईकची धडक; रुग्णालयात मृत घोषित
सकाळी चहा पिण्यासाठी घरातून बाहेर पडलेले सखाराम हरकळ बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्यांचा मुलगा शिवाजी हरकळ वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडला. कलावती देवीजवळ त्या दोघांची भेट झाली.
ते दोघे मिळून बोलत बोलत पायी चालत घरी निघाले. तेवढ्यात पाठीमागून एक भरधाव वेगाने आलेल्या बाईकने सखाराम हरकळ यांना जोरदार धडक दिली, त्यामुळे ते खाली पडून त्यांना गंभीर दुखापती झाली.
मुलगा शिवाजी याने तात्काळ वडिलांना रिक्षात टाकून पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले. तेथे उपचार चालू असतांनाच सखाराम हरकळ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमानी जवळ झालेल्या या मृत्यू प्रकरणी भरधाव बाईकवर आलेल्या अज्ञात तिघांविरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याचे गृहीत धरुन परभणीतील नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
