दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
आपल्या देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणारा व कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारा देशाचा शूर सैनिक हा आपल्या सर्वांचा आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. सैन्यदलात सेवा बजावलेले माजी सैनिक, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, देशातील सुरक्षा संबंधी मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहीमेत दिव्यांगत्व आलेले सैनिक, धारातीर्थी पडलेल्या शहीद सैनिकांचे वारस यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला जातो. या विविध योजनांविषयी….
शासकीय मदत व अनुदान:
युद्ध, युद्धजन्य परिस्थिती, देशातील सुरक्षा संबंधी मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहीमेत धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वारसास २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दिव्यांगत्व आलेल्या अधिकारी, जवानांना दिव्यांगत्वाच्या प्रमाणानुसार ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येते.
महाराष्ट्र गौरव योजना:
महाराष्ट्र गौरव योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना पुढीलप्रमाणे एकरक्कमी अनुदान देण्यात येते. परमवीर व अशोक चक्र – ३७ लाख ५० हजार रुपये, सर्वोत्तम युद्ध सेवा पदक, महावीर चक्र व कीर्ती चक्र – २२ लाख ५० हजार रुपये, उत्तम युद्ध सेवा पदक, वीर चक्र, शौर्य चक्र व युद्ध सेवा पदक- १५ लाख रुपये, सेना, नौसेना व वायुसेना पदक ७ लाख ५० हजार रुपये, मेन्शन इन डिस्पॅच सेवापदक ३ लाख ७५ हजार रुपये, परम विशिष्ट सेवा पदक २ लाख ५५ हजार रुपये, अति विशिष्ट सेवा पदक १ लाख ३० हजार रुपये व विशिष्ट सेवा पदक यासाठी ४९ हजार रुपये.
महाराष्ट्र गौरव योजनेअंतर्गत मरणोत्तर शौर्यपदक धारकांच्या विधवा व अवलंबिताना मासिक अनुदान:
परमवीर चक्र २१ हजार, अशोक चक्र १६ हजार ८०० रुपये, सर्वोत्तम युद्ध सेवा पदक व महावीर चक्र १५ हजार ९६०, कीर्ती चक्र १२ हजार ६००, उत्तम युद्ध सेवा पदक १० हजार ९२०, वीर चक्र ९ हजार २४०, शौर्य चक्र ५ हजार ८८०, युद्ध सेवा पदक ५ हजार ४० रुपये, सेना, नौसेना व वायुसेना पदक ३ हजार ३६०, मेन्शन इन डिस्पॅच सेवापदक १ हजार ६८० व व्हिक्टोरिया क्रॉससाठी १६ हजार ८०० रुपये इतके मासिक अनुदान देण्यात येते.
ध्वजदिन निधीमधून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
महाराष्ट्र राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के निधी (कल्याणकारी निधी) युद्धात शहीद व जखमी झालेले सैनिक तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणार्थ राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांवर खर्च केला जातो. तर उर्वरित ४० टक्के निधी (विशेष निधी) सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व चालविण्यासाठी वापरला जातो.
कल्याणकारी निधीतून मदत:
चरितार्थासाठी मदत:
विधवा व ६५ वर्षावरील माजी सैनिक व अनाथ पाल्य यांना कोणतेही निवृत्तीवेतनविषयक लाभ मिळत नसल्यास चरितार्थासाठी आर्थिक मदत देण्यात येते. त्याचे वित्तीय अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना ५०० रुपये एकरकमी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांना २ हजार रुपये दरमहा एक वर्षासाठी किंवा एकरकमी २० हजार रुपये व संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांना ३ हजार रुपये एक वर्षांसाठी किंवा एकरकमी ३० हजार रुपये असा आहे. माजी सैनिक दिवंगत झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीस एक वर्षासाठी किंवा कुटुंबनिवृत्ती वेतन सुरू होईपर्यंत दरमहा २ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
मुलीच्या लग्नकार्यासाठी अनुदान:
एका मुलीला लग्नकार्यासाठी १० हजार रुपये, ५० टक्केपेक्षा जादा दिव्यांगत्व असलेल्या माजी सैनिकाच्या दोन मुलींना प्रत्येकी १२ हजार रुपये व विधवेच्या दोन मुलींना प्रत्येकी १६ हजार रुपये, युद्ध विधवेच्या सर्व मुलींना व माजी सैनिक/विधवेच्या मृत्यू पश्चात सर्व अनाथ अविवाहित मुलींना प्रत्येकी ३० हजार रुपये अनुदान देण्यात येते. (क्रमश:)
संकलन: रोहिदास गावडे, उप माहिती कार्यालय, बारामती
