भाजप महायुतीचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होवोत किंवा त्यांच्या शिवसेनेचा दुसरा कुणी उपमुख्यमंत्री होवो, मंत्रिमंडळात अजितदादांचा क्रमांक तिसराच राहणार आहे.
भाजप महायुतीने संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री निवडला. अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचाच नंबर लागला. भाजप नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायलाच राजी केले, पण ते गृहमंत्री पदावरून अडले. आता जर भाजपचे नेतृत्व त्यांना गृहमंत्री पद देणारच नसेल, तर एकनाथ शिंदे यांना चॉईस आहे, तो म्हणजे शिवसेनेच्या दुसऱ्या कुठल्यातरी नेत्याला उपमुख्यमंत्री पदी बसवून आपण शिवसेना पक्षप्रमुख पदावर राहून काम करणे. पण ही स्ट्रॅटेजी भाजप नेतृत्व मान्य करणार नाही.
पण अगदीच तुटायची वेळ आली तर भाजपचे नेते कदाचित एकनाथ शिंदे यांचा हट्ट मान्यही करतील. पण शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याला संख्याबळाच्या आधारावर मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री पद द्यावे लागेल. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला उतावीळ झालेले अजितदादा तिसऱ्या क्रमांकावरच राहतील. त्यांचा क्रम महायुतीच्या सरकारमध्ये बदलण्याची शक्यता नाही.
वास्तविक काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये अजितदादा कायमचे उपमुख्यमंत्री राहिले होते, तरी त्यांचा मंत्रिमंडळातला क्रमांक दुसरा असायचा. तो कधी पहिला झाला नाही हे खरे, पण तो कधी तिसऱ्या क्रमांकावर देखील घसरला नाही. पण महायुती सरकार मध्ये मात्र अजितदादांचा क्रम तिसराच राहिला. तो दुसरा होऊ शकला नाही आणि ती शक्यताही नजीकच्या भविष्यात दिसत नाही.
