नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस; भंडाऱ्यात माजी प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले ?
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भंडाऱ्यात पहिला मेळावा पार पडला.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर भंडाऱ्याचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्यात.
महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा केवळ निवेदन देण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी वापर करू नका. यासाठी लागणाऱ्या गाडीच्या खर्चासाठी देखील कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करावे आणि केवळ निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात आल्यात.
पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल
यावर नाना पटोलेंनीही कार्यकर्त्यांनी केवळ पद न देता त्यांची जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडावी आणि पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे ध्येयधोरण गाव पातळीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावे, अशा कानपिचक्या घेतल्यात. नानांनी कार्यकर्त्यांनी पाच वर्ष मेहनत घ्या, पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असा ठाम विश्वासाचा बूस्टर डोस यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मनातील खदखद
दरम्यान, नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असताना कार्यकर्त्यांनी कधीही कुठलीही अपेक्षा आजपर्यंत व्यक्ती केली नव्हती. मात्र, त्याच कार्यकर्त्यांनी आता नाना पटोले प्रदेशाध्यक्ष नसल्याने त्यांच्या मनातील खदखद या मेळाव्यात बोलून दाखविल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
