
फडणवीस सरकारच्या नुकसान भरपाईवर शेतकरी नाराज !
महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून एकूण २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्याचा लाभ ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले.
याशिवाय फडणवीस म्हणाले, अद्याप पंचनाम्याचे काम थांबवलेले नाही. नवनव्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तिथे पंचनामे करून मदत केली जाईल. एखाद्या जिल्ह्यात आता कमी मदत दिसत असेल तरी उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी हा उद्देश आहे. घर, जमीन याबाबत नुकसानीची भरपाई देण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. पैशांची कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
मात्र यानंतरही मराठवाडा, विदर्भातील शेतकरी राज्य सरकारवर कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई मार्च २०२३ च्या शासननिर्णयानुसार दिली जाणार आहे. सध्या पिकांना असलेले हमीभाव व संभाव्य उत्पादन सरासरी यावर आधारित नसल्याने ३३ टक्क्यांवर नुकसान गृहीत धरून व २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या मदतीमधून उत्पादनासाठी लागलेला खर्चही भरून निघणार नसल्याचा रोष शेतकरी व्यक्त करत आहेत.
कोणत्या विभागाला किती निधी?
सरकारने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार, विदर्भातील अमरावती विभागातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्यांना ५६५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर नागपूर विभागातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांना २३ कोटी रुपयांची मदत दिली जाईल. पुणे विभागात सर्वात कमी नुकसान झाले आहे. विभागातील केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांना सुमारे १४ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल १० लाख ३५ हजार शेतकरी बाधित असून त्यांना ७२१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक बाधित शेतकरी लातूर जिल्ह्यात ३ लाख ८० हजार एवढे आहेत. त्याचप्रमाणे हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे. नाशिक विभागातील १७ हजार ३३२ शेतकऱ्यांना ९ कोटी ८६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.