
आमदारांना दिलेला भरघोस निधी गेमचेंजर ठरणार का ?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहे. या निवडणुका डिसेंबर, जानेवारीमध्ये होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षाने एकीकडे तयारी सुरु केली आहे.
त्यातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्यावतीने जवळपास 750 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले आहे. दोन विशेष योजनांच्या अंतर्गत 3 लाखांपासून 10 कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या निधीवाटपामुळे येत्या काळात शिवसेना, भाजपच्या आमदारांना मोठी मदत होणार असल्याने त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात आमदारांना दिलेला भरघोस निधी हा गेमचेंजर ठरणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून देण्यात आलेला बहुतांश निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळाला आहे. त्यासोबतच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आमदारांनाही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचे समजते. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या अनुषगाने दोन्ही पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
नगरविकास विभागाच्या या दोन योजनांमुळे नगर विकासाला पायाभूत सुविधा आणि विशेष प्रकल्पांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांना निधी वाटपाचे अधिकार मिळाले आहेत. महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील प्रभागांना निधी वाटपाचे अधिकार नगर विकासकडे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून देण्यात आलेला बहुतांश निधी महायुतीच्या आमदारांना मिळालेला आहे. त्यातही शिंदेसेनेच्या आमदारांना जास्त निधी मिळाला असल्याचे समजते. त्यामुळे शिंदेसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये येत्या काळात बरीच कामे होताना दिसणार आहेत. याचा फायदा त्या-त्या भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे.