
रामदास कदम यांच्यानंतर आता संजय शिरसाटांकडून त्या घटनेवर भाष्य !
शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी त्यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या निधनासंदर्भात एक टिप्पणी करून नव्या वादाला तोंड फोडले.
बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, त्या दोन दिवसांत मातोश्रीवर काय झाले?”, याची माहिती बाहेर काढेन, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या वर्तुळात खळबळ उडाली. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून आता शिवसेनेचे (शिंदे) नेते, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट यांना रामदास कदम यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला गेला. यावर त्यांनी कदम यांचे विधान बरोबरच असल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे निधन झाले, तेव्हा मीदेखील दोन दिवस तिथेच होतो, असेही ते म्हणाले.
“मीदेखील दोन दिवस त्यावेळी मातोश्रीवर होतो. माझ्या माहितीप्रमाणे विनायक राऊत (माजी खासदार) यांनी दोन दिवसाआधी तयार सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनीही याबाबत मातोश्रीला प्रश्न विचारला होता. काय झालंय आम्हाला माहिती द्या. त्यानंतर दिवाकर रावते आणि इतर नेत्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन जी तयारी केली ती पुन्हा तोडून टाकली, असा त्यावेळचा एक प्रसंग संजय शिरसाट यांनी सांगितला.
संजय शिरसाट पुढे म्हणतात की, बाळासाहेबांचे सरण या लोकांनी रचले होते. विनायक राऊत त्यात प्रमुख होते, हे मी नाव आज जाहीरच करतो. रामदास कदम यांनी चुकीचा आरोप केलेला नाही. सत्य सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा उहापोह आम्ही कधी केला नाही. आता झालेल्या गोष्टींची पुन्हा चर्चा करून आम्हाला बाळासाहेबांच्या आत्म्याला दुखवायचे नाही.
रामदास कदम काय म्हणाले होते?
दसरा मेळाव्यात बोलत असताना रामदास कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांचे निधन कधी झाले? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीने विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चालले होते? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळे कळत होते.
उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
दरम्यान कालच्या भाषणानंतर रामदास कदम यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन कालचा विषय सविस्तर मांडला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, “दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची उद्धव ठाकरे यांची सवय आहे. उद्धव ठाकरे हे दिसतात तसे नाहीत, ते कपटी आहेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, हे मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो आहे. मग यावर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊद्या. मी आज हे देखील स्पष्ट करतो की मी कधीही खोटं बोललो नाही.