
भुजबळांनी जरांगेंना पुन्हा डिवचलं !
मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्यात गुप्त बैठक झाली, असा दावा केला. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेचा अभ्यास किती? त्याचं शिक्षण काय? तो मराठ्यांचा लीडर नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलीय. तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांना पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काय ते जरांगे-जरांगे करता त्याचा अभ्यास किती? त्याचं शिक्षण किती? आपण उगाच त्याला डोक्यावर घेतो. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे लीडर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार हे आहेत. रोहित पवार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा त्या ठिकाणचे वाळू चोर, दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता आहे. तो महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचा नेता नाही, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला.
जरांगेंचा भुजबळांवर पलटवार
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्याला नेतेगिरीचे वेड लागले आहे. हुशार धनगर बांधवांना थांबवून ठेवले आहे. कुठल्याच ओबीसी जातीचा नेता तो होऊ देत नाही, त्याच खरं दुखणे नेता आहे. तू भेटला असेल तर भेटला असे मान्य कर. नागपूरमध्ये काँग्रेस मोर्चा काढणार आहे. हेच तुमच्या बैठकीत ठरले ना. तू फडणवीस, अजित पवार सगळ्यांच्या मागे लागला. त्यामुळं यातून डाव शिजतो आहे हे स्पष्ट दिसतंय, असे त्यांनी म्हटले. माझा अभ्यास त्याला माहिती आहे आणि तुला अजून कळलं नसेल तर काय कामाचा? पवारांनी तुला खाऊ घातले तिथं तू ×××× शिवसेना प्रमुखांना जेलमध्ये टाकले. तू मला अज्ञानी म्हणतो. तुझ्या अकलेची कुवत मला कळली, तुला एक जीआरमध्ये पाळायला जागा उरली नाही. बरं मी अडाणी आहे. घेतो का माझी शाळा? आणि मी नेता नाही, मी स्वतःला नेता म्हणत नाही. मला आजही मराठा आंदोलक म्हणतात. नेत्यांची हवा तुला आहे. तुला कळत नाही.
भुजबळ तू ओबीसी समाज तोडला. तुला सत्ता आणि पैसा पाहिजे. तू जेलमध्ये जाऊन आला. तू वाळूचोर लिडर बोलावे का? अलिबाबा सावध हो, डोक्याच्या शिरा सैल झाल्या तर पून्हा कुठूनही ×××××… तू बरबटलेला आहे, तू लै शहाणा आहे. इतका गचाळ माणूस कधीच पहिला नाही. आमच्या 800 आत्महत्या झाल्या. तुझ्या डोक्यात फक्त जातीवाद आहे, आमचे लोक गेले त्याच काय? फुकट आरक्षण खातो, त्याचं काय? अलिबाबा आम्ही आणखी दादागिरी केली नाही. मात्र आई बहीणीबाबत बोलले तर टोले खाणार, आम्ही बोलत नाही, तू आणि परळीची टोळी एकत्र येतात आणि आम्हाला निजाम औलाद म्हणतात, आम्ही तुम्हाला म्हटले का की तुम्ही मुघल औलाद आहात? असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलाय.