
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (5 ऑक्टोबर 2025) दोन वेळा भेट झाली. तर गेल्या तीन महिन्यात दोन्ही ठाकरे बंधूंची ही पाचवी भेट होती.
महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे हे रविवारी 40 मिनिटे मातोश्रीवर होते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा करताना म्हटले की, दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाली. याचपार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले की, मुंबई महानगरपालिकेवर महापौर कोणाचा होणार? या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना विचारण्यात आले की, मुंबई, ठाणे आणि पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी राजकीय परिस्थिती वेगळी आहे, असं तुम्ही म्हणालात. पण दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजन विचारे यांच्यात बैठक झाली. ठाण्यात काही वेगळा फॉम्यूला आहे का? ठाण्यात मविआ आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, काल आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रिया सुळे सुद्धा होत्या. याचा अर्थ मविआ सुद्धा आमच्या सोबतच आहे. मविआ आम्हाला कुठे सोडून गेलेली नाही. महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे, तिचं अस्तित्व, कार्य, भूमिका आणि महत्त्व कायम आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले की, महानगरपालिकेसंदर्भात एक वेगळा विचार असतो. त्यामुळे कुठे महाविकास आघाडी, कोणा-कोणाला आम्ही सामावून घेऊ शकतो. कुठे शिवसेना-मनसे आणि महाविकास आघाडीतील घटकांना सामावून घेऊ शकतो, ही एक साधी प्रोसेस नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गणितं आहेत आणि ती तशीच राहणार, त्यात बदल होणार नाही. कुठे शिवसेना-मनसे चालू शकतं. कुठेतरी महाविकास आघाडीला सोबत घ्यावं लागेल. कुठे फक्त शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, त्या प्रत्येकाबरोबर त्या-त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायदा आणि फॉम्यूला ठरवावा लागेल, असे राऊत यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं किती ठिकाणी एकमत झालं आहे. असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकमत आहे. याप्रमुख महापालिकेवर काम करावं लागेल. याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत, तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे. त्यांची कुठे मदत होईल. कारण काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्याचा विचार करून पुढील निवडणुकीसाठी करावा लागेल.
निवडणुकीनंतर महापौर कोणाचा होणार, याविषयी दावे केले जातात. तुम्ही म्हणतात की, शिवसेनेचा दावा होईल, राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते म्हणतात, मनसेचा महापौर होईल. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, असं कोणी काही म्हणालेलं नाही. राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणीही काही सांगितलेलं नाही. मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा व मराठी बाण्याचा होईल. भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे सांगतात, त्याप्रमाणे दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्मांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि महाराष्ट्राची गर्जना करेल, असा महापौर होईल.
ते रक्त आणि बाणा फक्त शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये आहे. मराठीसाठी निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठी लढणारे हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे कोणाचा महापौर होईल, याची कोणीही चिंता करू नये. आमचाच महापौर होईल, मी ‘हम’ या शब्दाने बोलतो आहे. ठाकरे बंधूंचाच महापौर होणार आहे. ही फक्त राजकीय युती नाही, तर तन, मन, धन, दिल और दिमाग अशी युती आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.