
भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. गवई यांच्यावर सोमवारी (06 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला.
सर्वोच्च न्यायालयातील 72 वर्षीय वकील राकेश किशोर याने हे विकृत कृत्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सरन्यायाधीशांशी फोनवरून बोलून या घटनेचा निषेध केला आहे. तर या वकिलावर कठोर कारवाईची मागणी देशभरातून होत असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरु वकिलाला माफ करण्याचा निर्णय घेतला. यानंतर वकील राकेश किशोर यांनी आपल्या कृतीवर माफी मागायचे सोडून कोणताही पश्चाताप नसल्याचे दाखवून दिले आहे. अशातच आता भाजपाच्या एका नेत्याने हल्लेखोराचे कौतुक करून एक नवा वाद निर्माण केला आहे.
राकेश किशोर यांनी सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. मंगळवारी त्यांनी बार कौन्सिलच्या कृतीवरील हिंदुस्तान टाईम्सच्या लेखाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला, ज्यामध्ये कॅप्शन दिले होते की, “त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही, दु:ख नाही.” यावर उत्तर देताना, कर्नाटक भाजप नेते आणि बंगळुरूचे माजी आयुक्त भास्कर राव यांनी राकेश किशोर यांचे कौतुक केले आहे. राजेश किशोर यांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही केलेली कृती कायदेशीररित्या चुकीची आणि भयंकर असली तरी, तुम्ही या वयात परिणामांची चिंता न करता घेतलेल्या भूमिकेचे आणि त्यानुसार वागण्याच्या तुमच्या धाडसाचे कौतुक आहे. मात्र भास्कर राव यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस नेते मन्सूर खान यांनी भास्कर राव यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, राकेश किशोर यांची कृती कायदेशीरदृष्ट्या चुकीची आणि भयंकर आहे. तरी तुम्ही त्याच्या धाडसाचे कौतुक का करता? एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने अशाप्रकारे बोलणे लज्जास्पद आहे. तुम्ही एकेकाळी कायद्याचे रक्षक होता. आता तुम्ही अशा व्यक्तीच्या बाजूने उभे आहात, ज्याने भारताच्या सरन्यायाधीशांचा अपमान केला आहे, अशा शब्दात मन्सूर खान यांनी भास्कर राव यांना सुनावले आहे.