
जाताजाताही भुजबळ, वडेट्टीवार, पवारांवर तोफ डागली !
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज रुग्णालयातून सुटी झाली. नारायण गडावरील दसरा मेळाव्याच्या पुर्वसंध्येलाच प्रकृती बिघडल्याने जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात भरती करावे लागले होते. अशा अवस्थेत त्यांनी नारायण गडावरील दसरा मेळाव्याला हजेरी लावली, एवढंच नाही तर आक्रमक भाषण करत विरोधकांना अंगावर घेतले.
दरम्यान, मराठा आरक्षणाला विरोध, न्यायालयात याचिका, ओबीसींचे आंदोलन या सगळ्या विषयावरून जरांगे यांनी गेल्या पाच-सहा दिवसापासून विरोधकांवर हल्ला चढवला. आज रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर जाताजाताही जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, काँग्रसेचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागली.
मराठ्याच्या हक्काचे सोळा टक्के आरक्षण काढून शरद पवारांनी ओबीसींना दिले, तरी हे त्यांच्यावरच उलटले. शरद पवारांना याचा आता पश्चाताप होत असेल, असे म्हणत जरांगे यांनी पहिल्यांदाच शरद पवारांचे या सगळ्या प्रकरणात नाव घेतले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप केला.
छगन भुजबळ ज्या जाती कधीही मराठ्यांच्या विरोधात नव्हत्या त्यांना भडकावत असताना अजित पवार गप्प कसे? ते बोलत का नाहीत? असा सवाल केला. अजित पवार यांनी साप पाळले आहेत, याचा त्यांना एक दिवस पश्चाताप होईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. अजित पवारांच्या पक्षातील सगळे नेते मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. बीडमध्ये होणारा ओबीसींचा मेळावा, मोर्चा हा अजित पवार पुरस्कृतच आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
भुजबळला वेड लागू शकंत..
छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत ते म्हतारं बावचाळलंय, त्याला आता महत्व द्यायचं नाही, त्याच्यावर बोलायंच नाही असं आम्ही ठरवल्याचे जरांगे म्हणाले. छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू समाजतो, मराठ्यांचा वाटोळं करण्यासाठी तो काम करतो. तो हतबल झाला आहे, त्याला वेड लागू शकते, असे सांगतानाच मी पितो तर तू पण ये प्यायला माझ्या सोबत, काहीही बोलतो अशी टीका जरांगे यांनी केली. मराठे आणि छोट्या जातींचे संबंध खराब करण्याचे पाप भुजबळ करतोय , आमच्या जीआरमूळ तो पिसाळल्यासारखा झालाय, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी भुजबळांवर तोफ डागली.
काँग्रेसला हिसका दाखवणार
दिल्लीतला लाल्या राहूल गांधीच्या सांगण्यावरून विजय वडेट्टीवार मराठ्यांच्या विरोधात ओबीसींचा मोर्चा काढणार आहे. त्याला आपलं राजकीय बस्तान बसवायंचय. पण विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्याची सुरूवात झाली आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांना टार्गेट करा, असे वडेट्टीवारला दिल्लीतून सांगितले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.