
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या चेहऱ्याचा उडाला रंग; खोटे…
इजिप्तमध्ये झालेल्या गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. गाझा शांतता परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले होते.
अगदी शेवटच्या मिनिटाला भारताला यासाठी आमंत्रित करण्यात आले. भारताने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांच्या माध्यमातून शिखर परिषदेत आपली उपस्थिती दर्शविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून ते उपस्थित राहिले. नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये सहभागी होणार का? यावरून चर्चा रंगताना दिसली होती. शेवटी नरेंद्र मोदी यांनी हिसका दाखवत स्वत: न जाता विशेष दूत म्हणून कीर्तीवर्धन सिंग यांना पाठवले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित नसताना देखील डोनाल्ड ट्रम्प त्यांचे काैतुक करताना दिसले.
परिषदेनंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत हा एक उत्तम देश आहे ज्याचे नेतृत्व माझा एक चांगला मित्र करतोय आणि खरोखरच ते खूप जास्त चांगले काम करत आहेत. मला वाटते की, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश मिळून चांगले राहतील. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेजवर त्यांच्या मागे उभे असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे वळून विचारले हो ना?…यावर शहबाज शरीफ यांनी मान हालवत होकार दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी चेहऱ्यावर मोठी स्माईल देखील दिली. मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि पाकिस्तानची जवळीकता वाढली आहे. यादरम्यान भारताने एक हात दूर अशी भूमिका अमेरिकेपासूनही घेतली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प सतत नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भारताचे काैतुक करताना दिसत आहेत. आता त्यांनी नरेंद्र मोदींना परिषदेचे निमंत्रण असूनही ते उपस्थित राहिले नसताना त्यांचे काैतुक करताना दिसले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले काैतुक ऐकून पाकिस्तानला मिरच्या लागल्या असतील हे नक्की आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रश्न विचारल्यानंतर इच्छा नसताना देखील शहबाज शरीफ यांना होकार द्यावा लागला. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. भारत-पाकिस्तान चांगले राहतील, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.