
गणेश नाईक यांचा मोठा खुलासा !
माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिल्ले होती. पण वनमंत्री झाल्यावर ते सोडून द्यावे लागले असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे स्वतःच्या आवडत्या प्राण्यांनाही कसे दूर करावे लागते, याचा अनुभव राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना सांगितला.
वनमंत्री होण्यापूर्वी आपण हरीण आणि बिबट्याच्या पिलांचे संगोपन केले होते, मात्र कायद्याचे बंधन आल्याने या वन्यजीवांना सोडावे लागले, अशी कबुली गणेश नाईक यांनी दिली होती.
गणेश नाईक काय म्हणाले ?
नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज्य मुस्लीम खाटीक समाजाच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना गणेश नाईक यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्यासाठी ते हरिण घेऊन आले होते. मी त्याचा सांभाळ केला होता. पण त्यानंतर वनमंत्री झाल्यानंतर आता त्याला आता ठेवू शकत नाही. म्हणून मग मला त्याला सोडून द्यावे लागेल, असे गणेश नाईक म्हणाले.
कायदा काय ?
कारण वनमंत्री झाल्यानंतर कायद्याने वनप्राणी पाळणे हा गुन्हा आहे. माझ्याकडे बिबट्याची पिल्ले देखील होती. आपण त्याला प्रेमाने सांभाळू, पण कायद्यानुसार हा गुन्हा आहे. तिथे आपल्या प्रेमाला आवर घालावा लागतो. त्यामुळे वनमंत्री झाल्यावर बंधने आली, असेही गणेश नाईक यांनी सांगितले. या विधानाद्वारे गणेश नाईक यांनी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार वन्यप्राणी पाळणे हा गुन्हा असून आपल्याला कायद्याचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याची माहिती दिली.
कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन
वन्यजीव पाळण्याच्या आठवणी सांगून झाल्यानंतर गणेश नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना एकजुट होण्याचे आवाहन केले. आता तुम्ही चिंता करू नका. संजीव नाईक, अनंत सुतार, मनोहर पटेल, राजेश पडवी या चौघांनी आता एकत्र या आणि काम करा, असा संदेश गणेश नाईक यांनी दिला. दरम्यान वनमंत्र्यांनी स्वतःच वन्यजीव पाळल्याची आणि नंतर कायद्यामुळे त्यांना सोडून द्यावे लागले, अशी कबुली दिल्याने सध्या याबद्दलची चर्चा पाहायला मिळत आहे.