
20 सामने खेळणाऱ्या फलंदाजाचे निधन !
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका सुरु आहे. याचदरम्यान पाकिस्तानचे सर्वात वयस्कर माजी क्रिकेटपटू वझीर मोहम्मद यांचे सोमवारी वयाच्या ९५ व्या वर्षी बर्मिंगहॅम येथे निधन झाले.
कसोटी खेळाडू हनीफ, मुश्ताक आणि सादिक मोहम्मद यांचे मोठे भाऊ वझीर यांनी १९५२ ते १९५९ दरम्यान २० कसोटी सामने खेळले. १९५२ मध्ये पहिली कसोटी मालिका खेळणाऱ्या पाकिस्तानी संघातील ते सर्वात वयस्कर सदस्य होते. निवृत्तीनंतर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे सल्लागार म्हणूनही काम केले. त्यानंतर ते ब्रिटनला गेले.
वझीर यांनी पाकिस्तानच्या सुरुवातीच्या कसोटी विजयांमध्ये काही संस्मरणीय खेळी केल्या, ज्यात १९५७-५८ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मॅरेथॉन १८९ धावांचा समावेश होता, ज्याने पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १९५४ च्या प्रसिद्ध ओव्हल कसोटी विजयात वझीर पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील होता.
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेचे घरच्या मैदानावर यजमानपद भूषवत आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना लाहोरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानला ही दुःखद बातमी मिळाली. देशभरात शोककळा पसरली आहे. वझीर यांचे नाव देशातील महान क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. त्यांचे जाणे हे संपूर्ण देशाचे नुकसान आहे. उद्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानी संघ काळ्या पट्ट्या बांधण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या आकडेवारीच्या विलक्षण ज्ञानामुळे वझीरला विस्डेन म्हणूनही ओळखले जात असे. त्यांना क्रिकेटचा विश्वकोश म्हटले जात असे. त्यांनी आकडेवारी तोंडपाठ केली होती.
पीसीबीने व्यक्त केला शोक
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली. पीसीबीने लिहिले की, ‘पाकिस्तानचे माजी फलंदाज वजीर मोहम्मद यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. ते पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारे मोहम्मद बंधूंपैकी चौथे होते. त्यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत पाकिस्तानसाठी एकूण २० कसोटी सामने खेळले.’
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या डावामध्ये पाकिस्तानच्या संघाने 378 धावा केल्या. तर सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून सेनुरन मुथुसामी यांने 6 विकेट्स नावावर केले. तर दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर 6 विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 216 धावा केल्या आहेत. अजूनपर्यत दक्षिण आफ्रिकेचा संघ 162 धावांनी पिछाडीवर आहे.