
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ कारखाना ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांना विक्री केल्याचा आरोप अॅड.परमेश्वर गित्ते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत बेकायदेशीर पद्धतीने झालेले खरेदीखत रद्द करण्याचीही मागणी केली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा कारखाना भाजपा नेत्या पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होता.
गोपीनाथगडाच्या जमिनीचीही विक्री ?
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कारखाना परिसरातच समाधीस्थळ आहे. या ठिकाणी ३ जून तसेच दि.१२ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर लोक अभिवादनासाठी येत असतात, परंतु आता या समाधीस्थळाच्या जागेसह सर्व मालमत्तेची विक्री संबंधित कंपनीला झाली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन करत आशिया खंडात नावारूपास आणलेल्या वैद्यनाथ कारखान्याला गत काही काळात घरघर लागली होती. कर्जाचा वाढत असलेला बोजा, कामगारांचे थकीत पगार, जीएसटीची थकीत रक्कम तसेच बंद असलेले गाळप यामुळे आर्थिक गणित बिघडलेले होते. यातच राज्यातील अनेक कारखान्यांना मदत मिळत असताना या कारखान्याला मात्र कोणतीही मदत सरकारकडून मिळा-लेली नव्हती. यावरूनही बरेच राजकारण झाले होते. यानंतर ज्या युनियन बँकेचे कारखान्यावर कर्ज होते, त्याच बँकेने कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबतची जाहिरात प्रकाशित केली होती.
त्यानंतर ओंकार साखर कारखाना प्रा.लि. ने हा कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. यानंतर कारखान्याचे सुरळीतपणे गाळपही सुरू झाले, परंतु दोन महिन्यांपूर्वी हा कारखाना बँकेने ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांना विक्री केल्याचा आरोप अॅड. परमेश्वर गित्ते यांनी केला आहे. हा कारखाना विक्री करताना कोणतेही कायदेशीर नियम पाळले गेले नाहीत. तसेच ज्या जमिनीची विक्री केली जाऊ शकत नाही, अशी जमीनही कवडीमोल दराने संबंधित कंपनीच्या घशात घातली गेली आहे. केवळ १३१ कोटींमध्ये हा व्यवहार झाल्याचे अॅड. गित्ते यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हा सर्व प्रकार म्हणजे शेतकरी तसेच सभासदांची फसवणूक आहे. यामुळे ही सर्व प्रक्रिया रद्द करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गित्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन करणार
वैद्यनाथ कारखाना विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या भागातील शेतकरी, सभासदांचे हित जोपासण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना उभा केला, परंतु त्यांना अंधारात ठेवून हा कारखाना विक्री करण्यात आला. हा सर्व प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रकार आहे. हा प्रकार आम्ही सहन करणार नाही, – येत्या दिवाळीपर्यंत यासंदर्भात कारवाई न झाल्यास तसेच शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाची सोय न झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी म्हणजेच गोपीनाथगड येथे आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.
कारखाना प्रशासनाचे मौन
दरम्यान, कारखाना विक्री प्रक्रियेसंदर्भात आरोप प्रत्यारोप होत असताना कारखाना प्रशासनाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे या सर्व प्रकाराबाबत संभ्रम वाढत असून, समाज माध्यमांतूनही यावर मोठी टीका केली जात आहे.