
अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेग करोडपती 17’ हा शो सध्या चर्चेत आला आहे. या शोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये 10 वर्षीय इशित भट्ट हॉटसीटवर बसला होता. परंतु बिग बींसोबत त्याचं उद्धट वागणं पाहून नेटकरी चांगलेच चिडले आहेत.
अनेकांनी इशितच्या वागण्यावरून टीका केली आहे. आता भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जीनेही नाराजी व्यक्त केली आहे. ‘त्याचं वागणं पाहून मलाच लाज वाटतेय’, असं तिने म्हटलंय. ‘केबीसी 17’च्या हॉटसीटवर बसलेला 10 वर्षीय इशित भट्ट अत्यंत आत्मविश्वासाने खेळत होता. काही प्रश्नांची उत्तरं तो पर्याय न ऐकताच देत होता. त्याची हुशारी पाहून अमिताभ बच्चन यांनीसुद्धा डोक्याला हात लावला. बरंतु संपूर्ण एपिसोडमध्ये इशितचं त्यांच्याशी वागणं अपमानास्पद असल्याचं म्हटलं गेलंय. या एपिसोडनंतर अनेकांनी त्याच्या आईवडिलांनाही ट्रोल केलंय.
राणी चॅटर्जीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केबीसीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत तिने लिहिलंय, ‘ही कसली शिस्त आहे? आपली पुढची पिढी अशी असल्याचं पाहून मला वाईट वाटतंय. आता मला माझ्या घरातील मुलं अधिक आदरपूर्वक वागणारी वाटत आहेत.’ या एपिसोडमध्ये इशित सुरुवातीलाच बिग बींना म्हणतो, “मला नियम सांगत बसू नका, मला सगळं आधीपासूनच माहीत आहे.” परंतु जेव्हा रामायणावरील प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्याला त्याचं उत्तर देता येत नाही. आईवडिलांनी त्याला योग्य शिस्त लावली नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
या एपिसोडमध्ये इशितने अनेकदा बिग बींना पूर्ण प्रश्नसुद्धा वाचू दिला नव्हता. ते बोलताना तो मध्येच त्यांना थांबवत होता. अखेर जेव्हा 25 हजार रुपयांसाठी रामायणाशी संबंधित प्रश्न विचारला जातो, तेव्हा इशितला उत्तर देता येत नाही. इशितने घाईघाईने दिलेलं उत्तर चुकीचं ठरल्यामुळे तो बाद होतो आणि त्याला घरी रिकाम्या हातीच जावं लागतं. या संपूर्ण एपिसोडमध्ये बिग बी ज्याप्रकारे त्याला समजून घेतात, त्याच्याशी विनम्रपणे बोलतात ते पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. बिग बींनी संपूर्ण परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याचं नेटकरी म्हणत आहेत.