
अजित पवारांचा विरोधकांना सल्ला !
महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षनेत्यांसोबतच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासोबत बैठक केली. यावेळी निवडणूक आणि मतचोरीवरून अनेक मुद्दे मांडले. पण, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.
विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. पुरावे असतील, तर आयोगाकडे द्या, आरोप बोलण्यापुरते करू नका, असे म्हणत अजित पवारांनी टोला लगावला. तसेच, निवडणूक आयोग त्यांना योग्य ते उत्तर देईल, असेही ते पुढे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आपल्या महाराष्ट्रात नेहमीच निवडणुका पारदर्शकपणे झाल्या आहेत. आरोप करणे आणि प्रत्यक्षात असणे यात फरक आहे. आरोपांमध्ये तथ्य असावे, तेव्हा त्यावर चौकशी होते. आयोग त्या संदर्भात शहानिशा करेल. ते म्हणाले की, एका मतदाराचे नाव एका ठिकाणी असेल तर तो दुसरीकडे मतदान करू शकत नाही. पूर्वी काही ठिकाणी शहरात आणि गावी दोन्ही ठिकाणी मतदान करण्याची प्रथा होती, पण तो काळ गेला. आता यंत्रणा अत्यंत पारदर्शक आहे. पवार यांनी सर्वांना सल्ला दिला की, या निवडणूक प्रक्रियेचा वापर प्रामाणिकपणे केला पाहिजे. जर कुणाकडे ठोस पुरावे असतील, तर ते आयोगाकडे द्यावेत. आरोप फक्त बोलण्यापुरते राहू नयेत. असे म्हणत टीका केली.
विरोधकांनी अलीकडे निवडणूक आयोगाशी घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. विरोधकांनी आपले मुद्दे मांडले आहेत, निवडणूक आयोग त्यांना योग्य उत्तर देईल. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला कोणाच्या बरोबर जायचे, हे ठरवण्याचा अधिकार आहे. तुम्ही हे प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा; ते त्याचं समर्पक उत्तर देतील.” असे ते म्हणाले.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती देताना अजित पवार म्हणाले, दर मंगळवारी आम्ही आमदार, नेते आणि मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावतो. मात्र आता दर महिन्याला एकदा सर्व जिल्ह्याध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पद्धतीने आज बैठक झाली. पुढील निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे, हा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.