
चीनने अमेरिकेच्या नाड्या आवळल्या आहेत, रेअर अर्थ मिनिरल्सची निर्यात बंद करून चायनाने अमेरिकेची मोठी कोंडी केली आहे. रेअर अर्थ मिनिरल्ससाठी अमेरिका ही पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे, याचा सर्वात मोठा फटका हा अमेरिकेला बसला असून, यामुळे अमेरिकेची उद्योग इंडस्ट्री संकटात सापडली आहे.
त्यामुळे चिडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावला आहे, या टॅरिफमुळे जगात नव्या व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे. या व्यापार युद्धामध्ये आता भारताचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
चीनने रेअर अर्थ मिनिरल्सचा पुरवठा थांबवल्यानंतर आता अमेरिकेकडून पर्यायी पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी नुकतीच रेअर अर्थ मिनिरल्स पुरवठ्या संदर्भात जी जग विरोधात चीन अशी यादी बनवली आहे, त्यामध्ये भारताचा समावेश हा मित्र राष्ट्रांमध्ये सुचीबद्ध केला आहे. याचा फायदा हा भारताला आता अमेरिकेसोबत जी व्यापार कराराची बोलणी सुरू आहेत, त्यामध्ये होणार असल्याचं मत दिल्लीतील एका प्रमुख व्यापार-धोरण थिंक टँकने व्यक्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये एका मोठ्या व्यापार करारासंदर्भात बोलणी सुरू आहे, मात्र अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे या चर्चेला ब्रेक लागला होता, त्यानंतर अमेरिकेचं शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आल्यानं पुन्हा या करारासंदर्भात चर्चा सुरू झाली, भारत आणि अमेरिकेमधील व्यापार 2030 पर्यंत दुप्पट करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. चीनने अमेरिकेची कोंडी केल्यामुळे आता भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार कराराला अधिक गती येईल असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
तसेच डोनाल्ड ट्रम्प येत्या काळात टॅरिफबाबत देखील मोठा निर्णय घेऊ शकतात, त्यांनी सध्या भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, मात्र लवकरच या धोरणात बदल होऊन भारतावर लावलेला टॅरिफ हा 18 ते 16 टक्क्यांवर देखील आणला जाऊ शकतो, असाही अंदाज आहे. चीनसोबत अमेरिकेचे संबंध आता अधिक ताणले गेले आहेत, ज्याचा फायदा येत्या काळात भारताला होणार आहे.