बँक घोटाळ्यात सगळं गमावल्यावर अभिनेत्रीने घेतला संन्यास; आई-बहिणीचा झाला मृत्यू !
अभिनेत्री नुपूर अलंकार ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ आणि ‘घर की लक्ष्मी बेटियां’ या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. नुपूरने २०२२ मध्ये संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.
आता ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नुपूरने या निर्णयामागचं कारण सांगितलं. तसेच अभिनय क्षेत्रात असतानाही शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक जीवन जगत होती, पण पीएमसी बँक घोटाळा, आई आणि बहिणीचा मृत्यू या घटनांनी तिला संन्यास घेण्यास प्रवृत्त केलं.
नुपूर म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे काही घडले, ते सगळं गुगलवर सापडेल. हे सगळं PMC बँक घोटाळ्यापासून सुरू झालं. त्या घटनेनंतर आयुष्याचं कठोर वास्तव समोर आलं. या घोटाळ्यानंतर माझी आई आजारी पडली, तिच्या उपचारासाठी आर्थिक समस्या आल्या. याचदरम्यान माझ्या आईचा आणि बहिणीचा मृत्यू झाला. हेच निमित्त ठरलं. असाही मला सांसारिक जीवनात रस उरला नव्हता. त्यामुळे मी त्यांची (पतीची) परवानगी घेतली. त्यांनी अनिच्छेने होकार दिला आणि मी आध्यात्मिक मार्गावर निघाले.”
अन्नासाठी भीक मागते- नुपूर अलंकार
नुपूर सध्या निवडलेल्या मार्गावर समाधानी आहे. ती इतरांनाही साधं, देवाशी जोडलेलं आयुष्य जगण्याचा सल्ला देते. अध्यात्मामुळे नुपूरच्या आयुष्यात शांतता आली. “मी या भौतिक जगापासून दूर गेल्यानंतर आयुष्य सोपं झालं. आधी वीजबिलं, लाइफस्टाइलचे खर्च, डायट्स – सगळं जपावं लागायचं. आता माझा महिन्याचा खर्च १०-१२ हजार आहे. वर्षातून काही वेळा मी ‘भिक्षाटन’ करते, म्हणजे अन्नासाठी भीक मागते. त्या अन्नाचा काही भाग मी देव आणि माझ्या गुरूंना अर्पण करते. त्यामुळे अहंकार नाहीसा होतो,” असं नुपूर अलंकारने नमूद केलं
मी गुहांमध्ये राहिलेय – नुपूर अलंकार
“माझ्याकडे फक्त चार-पाच जोड कपडे आहेत. आश्रमात येणारे लोक काही वस्त्रं देतात, ती माझ्यासाठी पुरेशी आहेत. मी गुहांमध्ये राहिले आहे, मला उंदीर चावले आहे, कडाक्याच्या थंडीत गोठल्याचा अनुभव घेतला, पण तरीही मी समाधानी आहे, असं नुपूर सांगते.
पीएमसी घोटाळ्यानंतर विकावे लागले दागिने
२०१९ मध्ये नूपुर अलंकारने PMC बँक घोटाळ्यामुळे तिला दागिने विकावे लागल्याचं सांगितलं होतं. “घरात एक पैसाही नव्हता, आमची सर्व खाती गोठवली गेली होती. त्यामुळे दागिने विकण्याशिवाय पर्याय नव्हता. एका सहकलाकाराकडून मला ३,००० रुपये उसने घ्यावे लागले. दुसऱ्याने प्रवासासाठी ५०० रुपये दिले. आतापर्यंत मी मित्रांकडून ५०,००० रुपये उसने घेतले आहेत. आम्हाला बँकेतील सर्व पैसे गमावण्याची भीती वाटते, असं ती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला म्हणाली होती.
मी कधीच कल्पनाही केली नव्हती की माझं आणि माझ्या कुटुंबाची संपूर्ण आयुष्यभराची कमाई अशा प्रकारे गोठवली जाईल. आता मी काय करू? घर गहाण ठेवू का? माझ्याच कष्टाने कमावलेले पैसे गोठवण्यात का आले? मी नियमितपणे कर भरत आलेय, तरी आज मीच का त्रास सहन करते आहे? असं नुपूर पीएमसी बँक घोटाळ्यानंतर म्हणाली होती.


