या बड्या नेत्याने सोडली साथ; शिंदेच्या सेनेत दाखल होणार…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिला टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत.
मात्र, या निवडणुका जाहीर होताच शरद पवार यांना पुणे जिल्ह्यातून मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.
अतुल देशमुख शिंदेसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उद्या ६ नोव्हेंबरला चाकण येथे पार पडणार आहे. त्यांच्या सोबत अनेकजण आपल्या हाती धनुष्यबाण घेणार आहेत. अतुल देशमुख यांनी पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे सेनेला उत्तर पुण्यात बळ मिळणार असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला लागलेली गळती या निवडणुकीसाठी मोठा फटका देणारी ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.अतुल देशमुख यांची खेड तालुक्यात मजबूत पकड असून, स्थानिक पातळीवर हजारो कार्यकर्ते आणि जनसंपर्क असल्याने त्यांचे येथील राजकारणात मोठे नाव आहे. एक वर्षापूर्वी भाजपचा राजीनामा देत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले होते.
अतुल देशमुख यांच्यासह चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपालिकांतील नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह अनेक कार्यकर्तेही शिंदेसेनेत दाखल होणार आहे. चाकण येथील भाग्यश्री मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतसह शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेते, आमदार आणि महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.


