मुंबईतील बैठकीत मोठा निर्णय…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्याचा मोर्चात महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी झाले होते. हा मोर्चा मतदार याद्यांमधील घोळ, दुबार मतदार यावर आवाज उठविण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चातून मनसेप्रमुख राज ठाकरे, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आदी नेत्यांची भाषणे झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे स्पष्ट संकेत पुन्हा एकदा दिले. यामुळे स्थानिक निवडणुकीत मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस पक्षाची स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त इंडिया आघाडीमधील पक्षांशीच युती करायची असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मनसेला सोबत घेण्याचा नकार असल्याचे स्पष्ट संकेत या निर्णयामुळे मिळत आहे. आता हा निर्णय दिल्लीत हायकमांडला कळवला जाणार आहे. या निर्णयावर हायकमांड कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत उद्धव ठाकरे सोडाच तर राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार नसल्याचे काँग्रेसचे भाई जगताप यांनी विधान केले होते. यामुळे काँग्रेसचे नेते मनसेसोबत न जाण्यावर ठाम असून, या निर्णयावर मुंबईतील बैठकीत एकमत झाल्याचे समजते. या बैठकीला काँग्रेसचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार रजनीताई पाटील, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार कल्याण काळे, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री के सी पाडवी, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, मुजफ्फर हुसैन, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात लढ्याची रणनीती, आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली.


