मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाजपला कानपिचक्या !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीसह निकालात फेरफार करण्यासाठी भाजपसोबत काम केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर करून खळबळ उडवून दिली आहे. तशात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बहुमतासाठी इतर पक्षाच्या लोकांना प्रवेश देण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपला शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मशिन असताना तुम्हाला कसली चिंता ?, अशा शब्दात कानपिचक्या दिल्या आहेत.
जळगाव महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने मोठी चाल खेळली असून, माजी मंत्री सुरेश जैन यांचे समर्थक असलेल्या ठाकरे गटातील तब्बल १५ माजी नगरसेवकांना पक्षात सामावून घेतले आहे. या घडामोडीनंतर शिंदे गट आणि अजित पवार गट अडचणीत आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोंडी आमची नाही तर भाजपची झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे जळगावचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढायच्या की स्वबळावर, यावर कोणत्याच पक्षात एकवाक्यता दिसून आलेली नाही. त्यात ठाकरे गटातील माजी मंत्री सुरेश जैन यांचे समर्थक असलेले दोन माजी महापौर आणि सुमारे डझनभर माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊ भाजपने मित्र पक्ष शिंदे गटासह अजित पवार गटाला डिवचले आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनही पक्षाच्या काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सत्तेबाहेर राहावे लागले होते. याशिवाय, विधानसभा निवडणुकीदरम्यान काही नगरसेवकांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचा अनुभव पक्षाने घेतला होता. सध्या भाजपने फुटून ठाकरे गटाला जाऊन मिळालेल्या तसेच बंडखोर झालेल्या नगरसेवकांसाठी पक्षाची दारे तातडीने खुली न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या पुनर्विचारासाठी आणि पुनर्प्रवेशाच्या शक्यतेवर विचार करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिल्याने भाजपच्या आगामी महापालिका रणनीतीबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोर तसेच पक्षातून फुटलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात सामावून घेतल्यास आणि ठाकरे गटातून प्रवेश केलेल्या १५ माजी नगरसेवकांनाही उमेदवारी दिल्यास, एकट्या भाजपकडून जळगाव महापालिकेत तब्बल ७५ जागांवर उमेदवार उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत महायुतीतील सहयोगी पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून नवीन राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपने राजकीय खेळी खेळून निवडणुकीपूर्वीच शिंदे गटासह अजित पवार गटाला ठेंगा दाखविल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
ठाकरे गटातील दोन माजी महापौर आणि डझनभर माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर शिंदे गटाची कोंडी झाल्याची चर्चा होत असली तरी, प्रत्यक्षात भाजपच अडचणीत सापडल्याचा दावा शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. भाजपला ठाकरे गटातील नगरसेवकांना पक्षात घेण्याची काहीच गरज नव्हती, असे सांगत आपल्याकडे कार्यकर्ते नाहीत का? की पक्षाची मशिन बंद पडली आहे? मशिन सुरू असताना भाजपला कसली चिंता? अशा शब्दांत पाटील यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.


