राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक आयोगाचा उडाला गोंधळ…
नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर तब्बल ५५० मतदार नोंदवले गेले असल्याचा आणि काही मतदारांच्या पत्त्याजवळ सुलभ शौचालयाचा पत्ता असल्याच्या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला होता.
यानंतर, राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात नवी मुंबईत चर्चेत आलेल्या संशयास्पद मतदार नोंदी प्रकरणावर निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केला होता. राज ठाकरे यांच्या प्रश्नाला आता, राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी “मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा वेगळी असून संबंधित प्राधिकरणांची स्वतंत्र जबाबदारी आहे,” असे सांगत जबाबदारी झटकल्याचे दिसून आले.
राज्यात सध्या सर्वत्र मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर मतदार याद्यांमधील घोळ दाखविण्यासाठी राजकीय नेत्यांकडून विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मतदार याद्यांमधील चुका दाखविण्यात येत आहेत. विरोधकांकडून सातत्याने निवडणूक आयोगावर दुबार मतदार आणि बोगस मतदारांच्या नावांवरुन टीका करण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी दुबार मतदार आहेत, तसेच अनेक मतदारांच्या नावासमोर पत्ताच नमूद नसल्याची बाब विरोधकांनी निवडणूक आयोगासमोर उघड केली. तर ,नवी मुंबईतील आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर ५५० मतदारांनी नावे नोंदवली, एकाचा तर पत्ता सुलभ शौचालय असल्याचे राज ठाकरे यांनी एका भाषणात सांगितले होते. सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे नोंदवण्यात आली असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्षाच्या मेळाव्यात उपस्थित केला होता. या प्रश्नावर अखेर निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा ही वेगळी आहे. आम्ही फक्त ती यादी वापरतो. एक तारीख ठरवतो आणि त्या दिवसाची यादी मतदानाला ग्राह्य धरतो. त्याची शहानिशाही आम्हीच करतो. दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेलं असल्यास ते तपासतो. ज्यांची नावे ही आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होती, पण आताच्या यादीत नसतील तर त्या नावांचा समावेश करतो. काही लहान-सहान दोष असतील तर ते दुरुस्त करतो. प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाची जी जबाबदारी आहे ती आम्ही घेतो, केंद्रीय निवडणुकीची जी जबाबदारी आहे ती ते पाहतात. असे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे म्हणाले.


