गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे मोठा उच्छाद मांडलेल्या व तेथील जनजीवन विस्कळीत केलेल्या नरभक्षक बिबट्यास अखेर मंगळवारी रात्री गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वन विभागाने नेमलेल्या शार्प शूटर पथकाने ही कामगिरी केली.
गेल्या १५ दिवसांत या परिसरातील रोहन बोंबे (वय १३), शिवन्या बोंबे (वय ५) यांच्यासह ज्येष्ठ महिला भागूबाई रंगनाथ जाधव (वय ८५) या तिघांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचे प्राण घेतल्याने या परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांनी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनासह गावबंद आंदोलन केले होते. त्यानंतर काल, ४ नोव्हेंबर रोजी पिंजऱ्यात अडकलेल्या एका बिबट्यास तेथून इतरत्र हलविण्यासही विरोध केला होता. त्या बिबट्यास रात्री माणिकडोह बिबट्या निवारण केंद्र येथे नेण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या संतप्त भावना व झालेले आंदोलन यानंतर वन विभागाचा वतीने या नरभक्षक बिबट्यास जेरबंद अथवा ठार करण्यासाठी वनसरंक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांची परवानगी घेतली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पिंपरखेडला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साला होता. पिंपरखेड परिसरात रेस्क्यू या संस्थेचे डॉ. प्रसाद दाभोलकर, जबीन पेस्टवाला, डॉ.सात्विक पाठक व दोन शार्प शूटर दाखल झाले होते.
या परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या निरीक्षणांतून बिबट्या जा-ये करीत असलेल्या मार्गावरील त्याच्या पायाचे ठसे याद्वारे बिबट्याचा माग घेण्यात आला. थर्मल ड्रोन कॅमेऱ्याच्या आधारे बिबट्याचा शोध घेण्यात आला असता, घटनास्थळापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट्या दिसला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला. पण हा प्रयत्न अपयशी ठरला. दरम्यान, चवताळून उठलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला केला. त्या वेळी शार्प शूटरने गोळी झाडून त्यास ठार केले. हा सर्व थरार मंगळवारी रात्री साडेदहाचा दरम्यान झाला.
मारण्यात आलेल्या बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्षांचा असून, ग्रामस्थांना मृत बिबट्याचे शव दाखविल्यानंतर शवविच्छदनासाठी ते माणिकडोह बिबट्या निवारण केंद्र येथे हलविण्यात आले आहे.जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक वनसरंक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे यांच्यासह तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.


