धाराशिव जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांचा पिक्चर क्लिअर…
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबरला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे या आठही नगरपालिकेतील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत.
काही ठिकाणी बिघाडी झाली आहे तर धाराशिव, तुळजापूर नगरपालिकेतील उमेदवाराबाबत भाजपने उमेदवारांचे नाव घोषित न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे. जिल्हयातील आठ ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या या नेत्यांमध्ये लढती होणार आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी नगरपालिका निवडणुकीची तयारी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीमधील भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील तीन मित्रपक्षांने एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला होता. मात्र, महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. परंडा, भूम येथे माजी मंत्री तानाज सावंतांविरोधात भाजपसह सर्वपक्षांने टाईट फिल्डिंग लावली आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांचा पिक्चर क्लिअर झाले असले तरी धाराशिव, तुळजापूर येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावाबाबत सस्पेन्स ठेवला आहे.
धाराशिव नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस एकत्र आली आहे. याठिकाणी ठाकरे सेनेच्या संगीता गुरव या उमेदवार असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रविणा कुरेशी रिंगणात उतरल्या आहेत. तर भाजपकडून उमेदवारांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. कळंब नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुनंदा कापसे, राष्ट्रवादीकडून डॉ. मीनाक्षी भवर तर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रश्मी मुंदडा या मैदानात उतरल्या आहेत. याठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहे.
तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसाचे अमर मगर उमेदवार आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देवानंद रोचकरी रिंगणात उतरले आहेत. भाजपने याठिकाणीही उमेदवार जाहीर केलेला नाही. नळदुर्ग नगरपालिकेत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत भाजपच्या बसवराज धरणे यांच्याशी होणार आहे. त्याठिकाणी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे. तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत आहे. याठिकाणी राष्ट्र्वादीकडून संजय बताले तर ‘एमआयएम’कडून शहबाज काझी मैदानात उतरले आहेत.
उमरगा नगरपालिकेसाठी महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किरण गायकवाड, भाजपचे हर्षवर्धन चालुक्य तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अमोल मोरे, ठाकरे सेनेचे रज्जाक अत्तार अशी चौरंगी लढत होत आहे. तर मुरूम नगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजपचे बापूराव पाटील विरुद्ध काँग्रेसचे अशी सरळ लढत होत आहे.
परंडा, भूम येथे माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात भाजपसह सर्वपक्षांने टाईट फिल्डिंग लावली आहे. परंड्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्या विरोधात भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकवटली आहे. याठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भूममध्ये शिंदे सेनेच्या संयोगिता गाढवे यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार सत्त्वशीला थोरात मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आठही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे.


