दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रताप नागरे
वाशिम
रिठद गावातील शेतकऱ्यांच्या संयमाचा अखेर बांध फुटला असून, दिवसा वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी तब्बल १५० हून अधिक शेतकऱ्यांनी रिठद विद्युत उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. शेतीपंपासाठी रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत वीज देण्याच्या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले होते.
दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक मोर्चा काढत शेतकरी उपकेंद्रावर दाखल झाले आणि कनिष्ठ अभियंता जाधव यांच्याकडे वेळ बदलण्याची ठाम मागणी केली. बोअरविहिरीतील पाण्याची पातळी कमी असल्याने मोटरपंप दोन-तीन तासांपेक्षा जास्त चालत नसल्याने रात्रीच्या वेळेत शेतीचे व्यवस्थापन करणे अशक्य होत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितले. पिके वाढीच्या अवस्थेत असताना रात्री पाइपलाइन बदलणे आणि पाण्याचे नियोजन करणे अत्यंत कठीण असल्याने दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी अधिक तीव्र झाली.
दरम्यान, कनिष्ठ अभियंता जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती दिली; मात्र वेळ बदलाबाबत वरिष्ठांकडून ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली. अखेर चर्चेनंतर सकाळी ५ ते दुपारी १ या वेळेत वीजपुरवठा करण्याचा तडजोडीचा प्रस्ताव देण्यात आला. फिडर ओव्हरलोड झाल्यास तात्पुरता पुरवठा बंद करण्याची अट घालून हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी सर्वानुमते मान्य केला.
घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वीजपुरवठ्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याची वस्तुस्थिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अशा आंदोलनांची तीव्रता अधिक वाढू शकते, हे प्रशासनाने लक्षात घेऊन शेतीपंपांना नियमित आणि दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
