खेड प्रतिनिधी
बद्रीनारायण घुगे
महाशिवरात्री निमित्त तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र येलवाडी येथे अखंड शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे. परंपरेनुसार आयोजित या सोहळ्याची सुरुवात माघ कृष्ण एकादशी, शुक्रवार (दि.१३) रोजी सकाळी पारायण व हरिपाठाने झाली. रात्री ७ ते ९ या वेळेत हभप रंगनाथ महाराज नाईकडे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला.
येलवाडी येथे प्राचीन येलेश्वराचे मंदिर असून या स्थळाला विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. संत संत तुकाराम महाराज यांच्या कन्या भागीरथी मातेचे सासर येलवाडी येथे असल्याने या गावाला संतपरंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त श्री येलेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ अखंड शिवलीलामृत पारायण, दुपारी १ ते ३ , वा वेळेत वरदा महिला भजनी मंडळ ( येल वाडी ) , रामदास सेवा भजनी मंडळ ( रूपीनगर ) ,तर शनिवार ( ता.१४ ) रोजी संत भागीरथीमाता मालोजी गाडे महिला भजनी मंडळ येलवाडी आणि संत तुकाराम भजनी मंडळ ( येलवाडी ) यांची ,भजनसेवा झाली. तर आज रविवार ( ता.१५ ) रोजी दुपारी १ ते ३ नादब्रम्ह भागीरथी माता महिला भजनी मंडळ , तर रात्री १० ते १२ संत भागीरथीमाता भजनी मंडळ ,आणि श्री येलेश्वर भजनी मंडळ ( येलवाडी) सुश्राव्य आशा भजनाचा लाभ शिभक्तांना घेता येणार आहे . सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, रात्री ९ ते ११ महाप्रसाद आणि रात्री ११ नंतर हरीचा जागर असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार (दि.१४) पासून हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर तसेच साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी (आळंदी) यांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
या सोहळ्याची सांगता सोमवार (दि.१६) रोजी श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र देहू येथील हभप संतोष महाराज काळोखे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी शिवतांडव ग्रुप, संत भागीरथी महिला मंडळ, मालोजी गाडे प्रतिष्ठान, दिंगबर ग्रुप, संघर्ष मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा ग्रुप आणि संत भागीरथीमाता महिला ग्रुप यांनी सहकार्य केले असून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त आयोजित या सोहळ्यासाठी परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.


