सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा…
बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे श्री क्षेत्र नगद नारायणगडाचा ७४ वा नारळी सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाला मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे हजर राहणार होते, मात्र ऐनवेळी त्यांनी अनुपस्थिती लावली.
मात्र आमदार धनंजय मुंडे मात्र थेट हेलिकॉप्टरने सप्ताहासाठी पोहोचले. नारायणगडाने कायम जरांगे पाटलांच्या मागे ताकद उभी केलेली आहे. मात्र यावेळी वेगळंच चित्र महाराष्ट्राने अनुभवलं.
थोर संत-महात्म्यांनी मराठवाड्यात जन्म घेऊन जगाच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची श्रीक्षेत्र नारायणगडाची मोठी परंपरा आहे, असे प्रतिपादन महंत शिवाजी महाराज यांनी केले. गेवराई तालुक्यातील उमापूर येथे आयोजित श्रीक्षेत्र नगद नारायणगडाचा ७४ वा भव्य नारळी सप्ताह मंगळवारी (ता. ७) अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी भाविकांचा अभूतपूर्व जनसागर लोटला होता.
काल्याच्या कीर्तनाप्रसंगी बोलताना महंत शिवाजी महाराज म्हणाले की, संत नगदनारायण महाराजांची सेवा केल्यावर खऱ्या अर्थाने नगद प्रसाद मिळतो. प्रत्येकाने समाजात वावरताना नम्र राहावे, गाईची आणि आईची सेवा करावी अन् रामकृष्ण हरी नामाचा जप करावा, असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. विशेषतः तरुणांनी या भक्ती सोहळ्यात घेतलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार विजयसिंह पंडित यांनी भेट दिली. व्यासपीठावर महंत दत्ता महाराज गिरी, माजी मंत्री बदामराव पंडित, नामदेव महाराज शेकटेकर, उत्तराधिकारी संभाजी महाराज, नारायण महाराज, शिवाजी महाराज गिरी, युधाजित पंडित, बप्पासाहेब तळेकर, ॲड. महादेव तुपे, चंद्रकांत नवले, गणेश नलावडे, रोहित पंडित, राजेंद्र मस्के, मुकुंद बाबर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उमापूरकरांच्या नियोजनाचे कौतुक
७४ व्या नारळी सप्ताहासाठी उमापूर आणि मारोतीचीवाडी येथील ग्रामस्थ गेल्या सहा महिन्यांपासून झटत होते. गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण भाविकांच्या सेवेत रुजू होते. या न भूतो न भविष्यती अशा सुंदर नियोजनाबद्दल महंत शिवाजी महाराजांनी उमापूरकरांचे विशेष कौतुक केले. या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी तन-मन-धनाने सहकार्य केले.
पुढचा सप्ताह अमृतमहोत्सवी
यंदाचा ७४ वा सप्ताह उमापूर येथे दिमाखात पार पडला. या सोहळ्याच्या सांगता प्रसंगी महंत शिवाजी महाराज यांनी महत्त्वाची घोषणा केली. पुढच्या वर्षीचा म्हणजेच सन २०२७ चा ७५ वा अमृतमहोत्सवी नारळी सप्ताह खुद्द श्रीक्षेत्र नारायणगडावरच संपन्न होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
