ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) दिवा: येत्या १४ एप्रिल रोजी साजरी होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिवा शहरात उत्साहात आणि शांततेत पार पडावी, यासाठी मुंब्रा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दिवा शहरातील सर्व जयंती उत्सवाच्या मंडळांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
उत्सवादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये, या उद्देशाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे PI अमोल कोळेकर व अनिल सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान विविध उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या, तसेच उत्सवाच्या नियोजनात येणाऱ्या संभाव्य अडचणी व समस्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या. पीआय अमोल कोळेकर यांनी या समस्या जाणून घेत, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना सर्व मंडळांना दिल्या. शांतता आणि शिस्त पाळून महामानवाची जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
या बैठकीला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक दीपक जाधव, समाजसेवक अमोल केंद्रे, दिनेश पाटील, सोपान जाधव, सुवर्णा कांबळे आणि उद्योजक बालाजी कदम यांच्यासह दिवा शहरातील अनेक मंडळांचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, यंदाची आंबेडकर जयंती दिब्यात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
