ट्रम्प आणि इराणने शरीफ-मुनीर यांच्यावर का दाखवला विश्वास…
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू होता, या संघर्षाला आता दोन आठवड्यांचा विराम मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीची घोषणा केली असून इराणने देखील याला दुजोरा दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांना सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मध्यपूर्वेत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाबद्दल माहिती दिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये अराघची यांनी सुरुवातीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचा उल्लेख ‘माझे प्रिय बंधू’ असा केला आहे. तसेच त्यांनी या प्रदेशातील युद्ध संपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अराघची यांची ही पोस्ट ट्रुथ सोशलवर शेअर केली आहे. यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या चर्चेमध्ये पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून असलेले भूमिका अधोरेखित होते.
दरम्यान यानंतरच लगेचच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट करत युद्धविरामाची घोषणा केली. ते म्हणाले की, “अत्यंत विनम्रपणे, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि अमेरिका त्यांच्या मित्रराष्ट्रांसह लेबनॉन आणि इतर सर्व ठिकाणी तात्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयार झाले आहेत.”
“मी दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे आभार मानतो आणि १० एप्रिल २०२६, शुक्रवार रोजी त्यांच्या शिष्टमंडळांना इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करतो, जेणेकरून सर्व वादांवर ठोस तोडगा काढता येईल,” असेही शरीफ यांनी यावेळी पुढे नमूद केले.
सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल मुनीर यांच्याशी चर्चा केली. रिपोर्टनुसार, फिल्ड मार्शल मुनीर हे रात्रभर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स, विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्या संपर्कात होते.
पाकिस्तानकडून मध्यस्थी
अमेरिका-इराण यांच्यातील युद्धविरामाची घोषणा होण्याच्या आधी ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला होता. “आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही,” असे ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामावर एकमत कसे झाले? तर या प्रश्नाचे उत्तर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्यातील निर्णायक डिप्लोमसी आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी केलेल्या मध्यस्थीत दडलेले आहे.
मार्च महिन्यापासून पाकिस्तानकडून आखाती देशातील शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानने तुर्किये, सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर २९ मार्च रोजी मध्यपूर्वेतील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा आयोजित केली होती.
युद्ध लांबतच गेल्याने इराण आणि अमेरिका यांच्याकडून या युद्धातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधले जात होते. अशा परिस्थितीतमध्ये पाकिस्तान हा बॅकचॅनल वाटाघाटींसाठी एक महत्त्वाचा मधस्थ देश म्हणून पुढे आला. पाकिस्ताननेच अमेरिकेचा १५ कलमी प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर इराणची त्यावरील प्रतिक्रियाही पुन्हा अमेरिकेपर्यंत पोहोचवली.
अमेरिका आणि इराण दोन्हींचा पाकिस्तानवर विश्वास का?
युद्धाच्या परिस्थितीत मध्यस्थी करण्यासाठी दोन्ही देशांचा मध्यस्थ देशावर विश्वास असणे गरजेचे असते. इराणच्या शेजारी असलेल्या अरब देशांचे अमेरिकेशी जवळचे संबंध आहेत, त्यामुळे इराणचा त्या देशांवर विश्वास उरलेला नाही. उलट अमेरिका-इराणने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने त्याच्या शेजारच्या देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागल्याचे दिसून आले.
दुसरे म्हणजे, पाकिस्तानची सीमा इराणला लागून आहे आणि या दोन्ही देशांमध्ये अत्यंत घनिष्ठ राजनैतिक संबंध राहिले आहेत. तसेच, पॅलेस्टाईनच्या मुद्द्यामुळे पाकिस्तानचे इस्रायलशी कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत आणि हेच एक इराणने पाकिस्तानवर विश्वास दाखवण्याचे प्रमुख कारण असू शकते.
अमेरिकेबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे गेल्या वर्षीपासून पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारले आहेत. पाकिस्तान ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीस मध्येही सामील झाला आहे, ज्याचा उद्देश गाझामध्ये शांतता प्रस्थापित करणे हा आहे. तसेच ट्रम्प यांनी यापूर्वीच पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा उल्लेख आपले ‘फेव्हरेट फिल्ड मार्शल’ असा केला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, मुनीर यांचे अमेरिका आणि इराणच्या संरक्षण यंत्रणांमध्ये चांगले संबंध आहेत, ज्यामुळे अशा वाटाघाटींमध्ये पाकिस्तानला थोडी मदत होते.
याबरोबरच पाकिस्तानचे इतर आखाती देशांबरोबर देखील चांगले संबंध आहेत. ज्यामुळे सुरू असलेल्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी ते सर्वांना एकत्र आणू शकतात.
पाकिस्तानलाही युद्धविरामाची गरज होती
पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हे फक्त भूराजकीय राजकारणापुरते मर्यादित नव्हते तर त्यांच्यासाठी देखील हा लांबलेला संघर्ष अडचणीचा ठरत होता. कारण पाकिस्तानचे बहुतांश तेल हे मध्यपूर्वेतून येते आणि अनेक पाकिस्तानी नागरिकी या भागात कामासाठी स्थलांतरित झालेले आहेत. तसचे प्रदेशात वाढलेला तणाव आणि इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनी रोखून धरल्याने जागतिक स्तरावर इंधनाचे दर प्रचंड वाढले होते. याचा थेट परिणाम म्हणून पाकिस्तानलाही आपल्या देशातील इंधनाच्या किमतीत मोठी वाढ करणे भाग पडले, ज्यामुळे शाहबाज शरीफ सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता.
पाकिस्तान आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, याबरोबरच पाकिस्तानचा शेजारच्या अफगाणिस्तानबरोबरही संघर्ष सुरू आहे. भारत पाकिस्तान संबंध देखील तणावपूर्ण आहेत, अशा परिस्थितीत इराणसारख्या आणखी एका शेजारी देशात अस्थिरता असणे हे पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळेही पाकिस्तानकडून युद्धविरामासाठी प्रयत्न केले जात होते.
पाकिस्तानच्या अंतर्गत स्थिरतेसाठीही युद्धविराम आवश्यक होता. अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली, यावेळी झालेल्या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला .
युद्धविरामात पाकिस्तानचे स्वतःचे हित गुंतलेले असल्यामुळे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीवर विश्वास दाखवला. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम हा दोन आठवड्यांसाठी आहे आणि येत्या काही दिवसांत या दोन देशांमध्ये वाटाघाटी कशा स्वरूपात होतील यावर याचे अस्तित्व टिकून असणार आहे. त्यामुळे, मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला या युद्धविरामासाठी राजनैतिक स्तरावर काही प्रमाणात श्रेय मिळत असले, तरी हा युद्धविराम अयशस्वी ठरल्यास त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा तडा जाऊ शकतो. तसेच, युद्ध पुन्हा सुरू झाल्यास त्यासाठी अमेरिका किंवा इराण यापैकी एक काहीही चूक नसतानाही त्याचे खापर पाकिस्तानवर फोडू शकतो.
