राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे झाले तीन भाग, वाचा कोणाकडे कोणती जबाबदारी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबाने आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
पक्षाची धुरा आणि राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी कुटुंबात जबाबदाऱ्यांचे औपचारिक वाटप निश्चित करण्यात आले असून, आगामी काळात राष्ट्रवादीची वाटचाल तीन मुख्य पातळ्यांवर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पवार कुटुंबाने जबाबदारीचे वाटप केले असून आता तीन पातळींवर नेतृत्व असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन पातळ्यांवर सत्तेचे केंद्र, कोणाकडे कोणती जबाबदारी?
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे राज्याची महत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
>> सुनेत्रा पवार : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार आता पक्षाचा मुख्य चेहरा असतील. त्यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्या राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत. अजित पवारांचा जनसंपर्क आणि विकासकामांचा झंझावात पुढे नेण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
>> पार्थ पवार : राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची राजधानी मुंबई आणि देशाची राजधानी दिल्ली येथील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारसोबतचा समन्वय, राष्ट्रीय राजकारण आणि मुंबईतून महायुतीमधील समन्वय आणि पक्ष संघटना मजबूत करण्यावर पार्थ पवार भर देणार आहेत.
>> जय पवार: पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीची आणि पुणे ग्रामीण भागाची संपूर्ण जबाबदारी आता जय पवार यांच्या खांद्यावर असेल. दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात या ठिकाणची जबाबदारी स्वीकारणे हे जय पवार यांच्या समोरील मोठं आव्हान असणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद, विकासकामांचा पाठपुरावा आणि बारामतीमधील वर्चस्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी जय पवार यांच्याकडे असेल. त्याच वेळी पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला आणखी बळकट करत राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जय पवार यांनी पक्ष मजबूत करावा लागणार आहे.
अजित पवारांच्या पश्चात पक्षावर आलेले हे मोठे संकट झेलण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकवटले असल्याचे या निर्णयावरून दिसते. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये आणि पक्षाची शिस्त कायम राहावी, यासाठी हे ‘पॉवर डिस्ट्रिब्यूशन’ अत्यंत महत्त्वाचे असल्याची चर्चा सुरू आहे.
