ट्रम्प यांचे भारताबाबत वादग्रस्त विधान; विरोधकांनी पंतप्रधानांना घेरलं…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांच्या भारतविरोधी अपमानास्पद विधानांचे समर्थन करणारी पोस्ट केल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे.
या प्रकरणी भारतातील विरोधा पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाने बाळगलेल्या मौनावरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राजसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी बाळगलेल्या मौनावरून टीका केली आहे. मोदीजींचे प्रिय मित्र, ‘नमस्ते ट्रम्प’ यांनी भारताला शिवीगाळ करणारी आणि अत्यंत अपमानास्पद शब्द असलेली नोट शेअर केली आहे. मोदीजी या हास्यास्पद विधानांवर पूर्णपणे गप्प आहेत, असे खरगे म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी कशाला घाबरत आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या यशात भारतीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मग अमेरिकन सरकारमधील सर्वोच्च स्तरावर हा मुद्दा मांडण्यापासून आपल्याला कोण रोखत आहे? भारत अमेरिका व्यापार कराराच्या अराखड्यापासून ते ट्रम्प यांच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान मध्यस्थी केल्याचा दाव्यापर्यंत, तसेच ट्रम्प यांनी जेव्हा ‘ब्रिक्स इज डेड’ असे विधान केले तेव्हा त्यांच्यासमोर हसण्यापासून ते अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्यापर्यंत- या प्रत्येक टप्प्यावर मोदीजी भारताचे हित गहाण ठेवत आले आहेत, असे खरगे म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सॅव्हेज यांनी अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्व देण्याच्या कायद्यावर टीका केल्याचा व्हिडीओ आणि ट्रान्सक्रिप्ट ट्रूथ सोशलवर शेअर केले होते. यानंतर वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडीओ फुटेडमध्ये सॅव्हेज हे म्हणाले होते की, येथे जन्मलेले मूल लगेच नागरिक बनते आणि मग ते संपूर्ण कुटुंबाला चीन किंवा भारत किंवा पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरकासारख्या ठिकाणाहून (हेलहोल) येथे घेऊन येतात.
खरगे यांनी यांनी ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या ट्रान्स्क्रिप्टमधील हा भाग अधोरेखित केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्यस्त निवडणूक वेळापत्रकातून थोडा वेळ काढून भारतीयांना धमकावणे आणि अपमान केल्याबाबत प्रतिक्रिया देतील, अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे खरगे यांनी यावेळी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींची खील्ली उडवत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी देखील पोस्ट केली आहे. भारताला ‘नरक’ (हेलहोल) आणि सर्व भारतीयांना ‘लॅपटॉप घेतलेले गँगस्टर’ म्हणणारी पोस्ट शेअर केल्याबद्दल त्या ट्रम्प यांचा निषेध करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही निषेध करणार आहात की बंगालमधील तुमच्या पुढच्या निवडणूक रॅलीला जाताना फक्त खी खी करणार आहात? असेही त्या म्हणाल्या.
