24 तासांच 4 संकेत अन् भयंकर युद्धाचं ‘काऊंटडाऊन’…
फेब्रुवारीपासून पडलेली युद्धाची ठिणगी अद्याप विझली नसून, आखाती देशांमध्ये येता काळ आणखी तणावाचा असेल असेच संकेत मिळत आहेत. चर्चा आणि भेटीगाठींच्या मागील 24 तासांमधील सत्रानं 4 असे संकेत दिले आहेत, ज्यामुळं युद्धाची शक्यता आणखी दाट होत चालली आहे.
अमेरिकेची तिसरी युद्धनौका यूएसएस जॉर्ज ड्ब्ल्यू बुश United States Central Command अर्थात सेंटकॉम क्षेत्रात तैनात झाली आहे.
सेंटकॉम हे अमेरिकी सैन्याचं ते क्षेत्र आहे, जे मध्यपूर्वेनजीकच्या भागांमध्ये होणाऱ्या कारवायांची जबाबदारी घेत असतं. हिंदी महासागरातील सेंटकॉम क्षेत्रात अमेरिकेची ही लढाऊ विमान उतरवता येणारी युद्धनौका तैनात झाल्यानं आता एकूण युद्धनौकांची संध्या तीनवर पोहोचली आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये अमेरिकेची ही चाल जगाची चिंता वाढवून जात आहे. प्रत्यक्षात 2003 च्या इराक युद्धानंतर अमेरिकेनं या क्षेत्रात पहिल्यांदात एका वेळी तीन युद्धनौका आणल्या आहेत.
5 हजार सैनिक शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवून
फक्त युद्धनौकाच नव्हे, तर नव्यानं आलेल्या या अवाढव्य लष्करी जहाजातून तब्बल 5000 विशेष प्रशिक्षित सैनिकांनाही अमेरिकेनं पाचरण केलं आहे. याआधीच ट्रम्प यांच्या देशाचे साधारण 50 हजार सैनिक इथं तैनात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या युद्धनौकेवर आधुनिक फायटर जेट F-35चं मरीन वर्जन तैनात असून त्यामुळं ट्रम्प यांच्या फळीची मारक क्षमता आणखी विस्तारीत भागापर्यंत वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही.
तांबड्या समुद्रामध्ये यूएसएस जेराल्ड फोर्ड आणि यूएसएस अब्राहम लिंकन तिथूनच तैनात असणाऱ्या अरबी समुद्रात तैनात आहे. ही अमेरिकेची एक मारक तुकडी असून, त्यामध्ये सपोर्टींग शिप, पाणबुड्या आणि 5 ते 6 युद्धनौका असा ताफा समाविष्ट असतो. शिवाय यावर टॉमहॉक आणि अँटी एअरक्राफ्ट मिसाईलसुद्धा सज्ज असतात. तिसऱ्या युद्धनौकेमुळं अमेरिकेमध्ये एअर डिफेंस अॅक्टीव्ह झाला असून, आता इराणसुद्धा कोणत्याही क्षणी होणाऱ्या हल्ल्यासाठी सज्ज होत असल्याचं म्हटलं जात आहे.
शक्य तितक्या लवकर इराण सोडा
भारताच्या दूतावासानं ही तणावग्रस्त परिस्थिती पाहता इराण देश सोडण्याचा इशारा जारी केला आहे. यासाठी हेल्पलाईन क्रमांकसुद्धा जारी केला असून, शक्य असल्यास रस्ते मार्गानं देश सोडण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेनं युद्धविरामाची घोषणा केली असली तरीही भारताकडून या निर्णयाकडे विश्वासार्हतेनं पाहिलं जात नाहीय, या क्षेत्रातील तणावग्रस्त परिस्थिती पाहता नागरिकांना सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
