जयंत पाटील-विश्वजित कदमांचे नाव घेत पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट…
सांगली जिल्ह्यातील राजकारण भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या गौप्यस्फोट आणि राजकीय खेळीमुळे चांगलेच तापलेलं आहे. नुकताच त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, “विशाल पाटील पुढचे खासदार नसणार” असे विधान करत सांगलीच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. तसेच जतचे अध्यक्षपद घालवणाऱ्यांचा ‘कार्यक्रम’ होणार असल्याचा इशाराही दिला होता. ज्याची राज्यभर जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेस नेते तथा अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून विशाल पाटलांचा विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांनी ठरवून गेम केला असं म्हटलं आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा सांगलीसह राज्यातील राजकारण आता तापण्यास सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यातील बाजार समितीचे त्रिभाजन करून गोपीचंद पडकर यांनी महाविकास आघाडीचे पाणीपत केल्याची चर्चा होती. एकीकडे राज्यातील सर्व तालुक्याच्या स्तरावर बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेत बाजार समितींच्या त्रिभाजनचा आदेश काढण्यात आला होता. ज्याची सुरूवात सांगलीतून झाली.
यामुळे महायुतीने महाविकास आघाडीची सत्ता असणारी बाजार समिती खालसा करत जिल्हा परिषदेतील पराभवाचा बदला घेतल्याचे बोलले जात होते. तसा आरोपच मविआच्या नेत्यांनी केला होता. ज्यानंतर पुन्हा येथे निवडणूका होणार नाहीत, असा गर्भीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी दिला होता. ज्यानंतर येथे राजकीय वार पलटवार सुरू झाले होते.
अशातच पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार फिल्डिंग लावत जयंत पाटील यांच्या हातात असणाऱ्या जिल्हा बँकेच्या चौकशीचा फास आवळला. यामुळे आता महिन्याभरात पडळकरांनी जयंत पाटलांचा टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा सुरू झाली होती. तोच आता पडळकर यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीदरम्यानच्या जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उकळी फुटली आहे.
पडळकर यांनी काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट विशाल पाटील यांना मिळणार नाही, हे निश्चित होते. तर याची आधीच माहिती जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना होती. दोघांनी मिळून हे सर्व ठरवून केलं होतं, विशाल पाटलांचा ठरवून गेम केला होता. असा खळबळजनक गौप्यस्फोट पडळकर यांनी केला.
पडळकर म्हणाले, ” काँग्रेस विशाल पाटील यांना तिकीट देणार नाही याची कल्पना या दोघांना होती. त्यामुळे या दोघांनी स्टंट केला. पण विशाल पाटील थांबले नाहीत. त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. यामुळे मनाने नाही, तर शरीराने जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना विशाल पाटलांसोबत राहावं लागलं.
तर आता ‘घोडमैदान लांब नाही’ असे म्हणत पडळकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. तसेच आता आम्ही पण मैदानात उतरणार असून बघू त्यावेळी काय होतं ते असे म्हटलं आहे. तसेच “२०२९ ला खरोखरच विशाल पाटील खासदार व्हावेत, अशी विश्वजित कदम यांची इच्छा आहे का?” असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान आता पडखळकरांच्या या गौप्यस्फोटासह विश्वजित कदम यांना विचारलेल्या खोचक प्रश्नामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
