तिकीट कापताच अमोल मिटकरींनी व्यक्त केली खदखद ; पक्षातील दिग्गज नेत्यांना केला थेट सवाल…
राज्यातील विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारीवरून आता पक्षात नाराजीचे सूर उमटताना दिसून येत आहेत.
विधानपरिषदेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
“माझ्याशी कोणताही संपर्क साधला गेला नाही किंवा मला विश्वासातही घेतले गेले नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) विधान परिषद निवडणुकीसाठी आता झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
झिशान सिद्दीकी याना उमेदवारी मिळाल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी, “मी झिशान सिद्दीकी यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या निवडीचा मला आनंदच आहे. पण दुःख एकाच गोष्टीचे वाटते की, जर ही जागा झिशान यांना द्यायची होती, तर ‘दादां’नी (अजित पवार) किमान फोन करून मला सांगितले असते. की यावेळी तुम्हाला थांबावे लागेल, तुम्हाला एकदा संधी दिली आहे, आता दुसऱ्याला संधी देऊ,’ असे सांगून मला विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, मला साधा फोनही केला गेला नाही.असे म्हणत त्यांनी पक्ष श्रेष्टींविषयीची नाराजी बोलून दाखवली.
ते पुढे म्हणाले, “आमदारकी झिशान सिद्दीकी यांना देताना वरिष्ठांनी मला विचारात घेतले नाही. मी ‘दादां’सोबत शेवटपर्यंत कायम राहिलो, त्यांच्यासाठी लढलो. ही जर माझी चूक असेल, तर अशा चुका करण्याचा मला अभिमानच असेल. आयुष्यात अशा हजार संधी येतील, आयुष्य संपलेले नाही. मी यापुढेही गोरगरिबांचे प्रश्न मांडत राहीन आणि काम करत राहीन. माझे तिकीट का कापले, याचे उत्तर पक्षातील दिग्गजांनी द्यावे, असेही मिटकरी यावेळी म्हणाले.
पार्लमेंट बोर्डाने बैठक घेतली, हे ठीक आहे. मात्र, त्या जागेवर सध्या कार्यरत असलेल्या आमदाराला किमान एक फोन करायला हवा होता; पण तसे काहीही झाले नाही. मला का डावलण्यात आले, याचे कारण आता पक्षातील वरिष्ठांनीच स्पष्ट करावे. गेल्या सहा वर्षांतील माझ्या कामात काही चूक झाली असेल, तर ती सांगावी. मी सभागृहात तरुण आणि शेतकऱ्यांसह सर्वच महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत. अगदी शेवटच्या अधिवेशनातही अजितदादांच्या बाजूने मी ठामपणे उभा राहिलो. मात्र, ही जागा दुसऱ्याला देताना जर मला साधे विचारलेही जात नसेल, तर याचा काय अर्थ समजावा? पक्षाने मला किमान विश्वासात तरी घ्यायला हवे होते.
