
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
आंबे टाकळी: दि.८.जवळपास पाच महिने आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. आणि अखेर काही प्रमाणात मागण्या मंजूर झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. दरम्यान घडलेल्या अनेक नाट्य घडामोडी आपल्या सर्वांनाच माहिती आहे.मात्र यामुळे गेल्या चार-पाच महिने सर्व एसटी तसेच एकाच जागेवर उभे असल्याने अनेक बसेस मध्ये आता बिघाड होताना दिसतोय. त्यामुळे बसेस रस्त्यावर नादुरुस्त होऊन बंद पडतांना दिसून येत आहे. जवळपास सर्वच आगारातून भंगार गाड्या रस्त्यावर धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.खामगाव मेहकर रोड वरील मेहकर आगाराची बस आंबेटाकळी फाट्यावर थांबली असताना सुरू होत नसल्याने अखेर प्रवाशांना भर उन्हात खाली उतरून बस ला धक्का मारावा लागला. आणि जवळपास अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर बस सुरू झाली. तर या रस्त्यावर बस सुरू झाल्यापासून अशा अनेक घटना घडतात. अशी माहिती प्रवाशानी दिली. त्यामुळे जिल्ह्यात भंगार वाड्यांचा अधिक भरणा झाला की काय? ज्यामुळे अशी परिस्थिती बघायला मिळते. आधीच संपामुळे गेली चार-पाच महिने प्रवाशांची गैरसोय होताना दिसली आणि आता भंगार गाड्यामुळे प्रवाशांना भर उन्हात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्याकडे ( प्रश्नाकडे )गांभीर्याने लक्ष देणारे कोणी आहे का?