
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवी सरकार इंगळी
इंगळी : रूई येथील लेखक एम् . एस् .जाधव तथा कवी बाबा जाधव यांना भूक काव्यसंग्रहासाठी कालकथित बाबासाहेब नामदेव भोसले स्मृती राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. जोगदंड-हारे या साहित्य संस्थेतर्फे हा पुरस्कार दि.२९ मे रोजी पुणे येथे समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष तथा कवी चंद्रकांत जोगदंड यांनी कळवले आहे. कवी बाबा जाधव यांच्या भूक या काव्यसंग्रहाला मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार असून त्यांनी वैचारिक, समीक्षा, चारोळी आणि कथालेखन केले आहे. विषय विविधतेने नटलेला हा काव्यसंग्रह म्हणजे कवी जाधव यांनी भवतालच्या वास्तव समस्यांवर केलेली मार्मिक टिप्पणी आहे.
भूक हे इचलकरंजी येथील पद्मरत्न प्रकाशनचे पुस्तक आहे. भूकेची विविध रूपे आणि समाज याचे दोलायमान चित्र विदित होते. ग्रंथप्रसार व वाचनचळवळीच्या वृद्धीसाठी अविरत कार्यरत असणारे प्रकाशक तथा लेखक श्री. दादासाहेब जगदाळे व कवी बाबा जाधव यांच्यावर साहित्यक्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व उत्कृष्ठ साहित्य निर्मितीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.