
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे, दि. 10: राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही त्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः ३ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.
वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.