दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:राज्यभर गाजलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यात आरोपी असलेले तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी/ उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हे मागील तीन वर्षाहून अधिक कालावधीपासून फरार होते. आज सकाळी त्यांनी नायगाव न्यायालयासमोर हजर होत आत्मसमर्पण केले. त्यानंतर आज शुक्रवार दिनांक 17 जून रोजी नायगाव न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून न्यायालयाच्या आदेशानंतर सीआयडीने त्यांना अटक केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर येथील एमआयडीसी भागातील इंडिया ऍग्रो मेगा कंपनीमध्ये शेतकऱ्यांच्या धान्यावर प्रक्रिया उद्योग आहे. परंतु या कंपनीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांना हाताशी धरून कंपनी मालक अजय बाहेती, वाहतूक कंत्राटदार राजु पारसेवार आणि हिंगोलीचे ललित खुराणा यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा काळाबाजार मागील अनेक वर्षापासून सुरु असल्याच्या कारणावरून पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी आपल्या पथकासह दि. 18 जुलै 2018 रोजी रात्री कृष्णूर एमायडीसीमधील इंडिया मेगा कंपनीत धाड टाकली. यावेळी या कंपनीत उभे टाकलेले सार्वजनिक वितरण प्रणालीचे जवळपास 19 ट्रक धान्य त्यांनी जप्त केले.यावेळी 19 जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जवळपास बाराशे पानाचे दोषारोपपत्र दाखल केले. यात जवळपास एक वर्षानंतर कोरोनाच्या संकटामुळे आरोपींना न्यायालयाने जामीन दिला. या धान्य घोटाळ्यात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हेही आरोपी होते. मात्र ते फरार झाले. दरम्यानच्या काळात त्यांची नांदेडहून परभणी येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यांनी जामीन मिळावा म्हणून नायगाव, बिलोली आणि औरंगाबाद येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, परंतु न्यायालयाने हा सार्वजनिक गुन्हा असल्याने जामीन फेटाळला..
दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टातुन त्यांनी जामीन मिळवून परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला. काही दिवसांनी हे प्रकरण ईडीकडे गेल्याने यातील मुख्य आरोपी अजय बाहेतींना नागपूर ईडीने अटक केली. तेंव्हापासून संतोष वेणीकर हे पुन्हा फरार झाले. अखेर याप्रकरणी कुठेच जामीन होत नसल्याने ते स्वतः आज शुक्रवार दिनांक 17 जून रोजी नायगाव न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीआयडी पथकही नायगावात दाखल झाले असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी वेणीकर यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कृष्णुरचा धान्य घोटाळा चर्चेत आला आहे.
