
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:- गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसला असून या दोन्ही फळझाडांना येणारा मोहोर पूर्णतः गळून पडण्याची चित्र सध्या दिसत आहे.लहरी वातावरणामुळे व अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.यंदा पावसाळी हंगाम लांबल्यामुळे पावसाचा कालावधी वाढला परिणामी आंबा व काजू या पिकांवर परिणाम होऊन मोहर प्रक्रिया लांबणीवर पडली.त्यामुळे नुकताच या दोन्ही फळझाडांना मोहर फुलण्याचा कालावधी चालू होताच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने या दोन्ही पिकांना झोडपून काढले.त्यामुळे आगामी येणारे पीक करपल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत निसर्गाचा वाढलेला लहरीपणा तसेच लांबत चाललेला पाऊस यामुळे वातावरणात होणारा बदल याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकावर झाल्याचे दिसून येत आहे.साधारणपणे परतीच्या पावसाला सप्टेंबर महिन्यात सुरुवात होते.परंतु यावर्षी खरीप हंगाम वाढल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा कालावधी सुद्धा वाढला आहे.त्यामुळे हंगामी पिकांना याचा फटका बसत असून पिकांच्या उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.