
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : तालुक्यात सर्वात मोठी समजली जाणारी कारेगावची ग्रामपंचायत आप्पाराव पंढरीनाथ वावरे यांच्या युवा परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात गेली आहे. पॅनेल प्रमुख म्हणून नेतृत्व करणारे आप्पाराव वावरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. पूजा आप्पाराव वावरे यांनी २,८८८ मतांपैकी तब्बल १ हजार ८८५ मते मिळवून सरपंच पदाची बागडोर आपल्या हाती खेचून आणली आहे. यापूर्वी ती सत्ता परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव अवचार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या ताब्यात होती. एकूणच काय तर कारेगाव ग्रामपंचायतची निवडणूक ही स्थानीय नेत्यांच्या अस्तित्वाचीच लढाई ठरली जात आहे एवढे नक्की.
कारेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात माजी सरपंच पंढरीनाथ वावरे, माजी सरपंच रामभाऊ अवचार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, कोंडीराम अवचार आदींचा गट प्रबळ आहे तर दुसरीकडे तोडीस तोड म्हणून समजला जाणारा गट म्हणजे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव अवचार, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सोपानराव अवचार सिनीयर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम विकास पॅनेलचे नेतृत्व होते. या दोन्ही मातब्बर व स्थानिक गटांमध्येच कारेगावचे राजकारण खेळले जात असून ते जणू त्या सर्वांच्याच अस्तित्वाची लढाई ठरली जात असल्याचे दिसून आल्यास नवल वाटू नये. विजयी गटाचे युवा परिवर्तन पॅनेल आणि पराजित गटाचे ग्राम विकास पॅनेल या दोन्ही गटांमध्ये थेट सामना होऊन लढतही अत्यंत चुरशीची झाली हे नाकारुन चालणार नाही. सत्ता नेमकी कोणत्या गटाकडे जाईल, याची शास्वती शेवटच्या क्षणापर्यंत सांगणे कठीण झाले होते. किंबहुना हीच चुरशीची लढत गाव आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी झाली तर नक्कीच गावाचे भाग्य उजळले जाईल, असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. गावाच्या रहदारीसाठी असलेला एकमेव रस्ता पण तोही सुधारला जात नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे ? खरं तर हा रस्ता दुहेरी वाहतूक करता येईल अशा प्रमाणे विकसित केला जाणे आवश्यक आहे. तसे झाले तर सभोवतालच्या सर्व जमिनींचे भाव सुध्दा गगनाला भिडले जातील यात शंकाच नसावी. या रस्त्याला जोडूनच उजवीकडे पिंगळी रस्त्याला तर डावीकडे दत्तधाम परिसर व हायवेला जोडला जाणे महत्वाचे ठरले जाणार आहे. ज्यामुळे गाव आणि परिसराच्या दळण-वळणासाठी अत्यंत उपयुक्त ठरला जाऊन त्या भागाचे बाजारमूल्य सुध्दा कमालीचे वाढले जाईल.
कारेगाव ग्रामपंचायतचा संपूर्ण परिसर शिवसेनामय असल्याचे सर्वश्रुत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे येथील मतदार शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांमध्येच विभागला गेला आहे. खासदार संजय जाधव यांनाही मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात असून उर्वरित भाग हा आमदार डॉ.राहूल पाटील यांना मानणारा आहे. येथे होणारी ग्रामपंचायतीची निवडणूक सुध्दा या दोन्ही गटांमध्येच कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून लढवली जाते. या अगोदरची सत्ता खासदारांना मानणाऱ्या गटाची होती तर विद्यमान सत्ता ही आमदारांना मानणाऱ्या गटाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच काय तर सत्तेच्या पटलावर बसून कारभार करतांना विकासाची बागडोर कोणाकडेही जरी गेली तरी ती मूळ शिवसेनेकडेच राहिली गेली आहे एवढे नक्की. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना विभागली जाऊन त्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना असे दोन भाग झाले आहेत. तथापि राज्यातील त्या बदलाचा कारेगावच्या मतदारांवर आणि परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर काहीच फरक जाणवला नाही. येथे मूळ शिवसेनेला मानणाराच मतदार असल्याचे सिद्ध झाले आहे. तद्वतच. खा सरदार संजय जाधव आणि आमदार डॉ.राहूल पाटील यांनीही उध्दव ठाकरे यांचीच शिवसेना हक्काची समजून तीच पसंती केली आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही पक्षाला न मानता परभणी व कारेगावची मतदार जनता ही उध्दव ठाकरे यांनाच मानणारी आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून जिल्हाभरातील ही शिवसेना आमदार-खासदार या दोन्ही नेत्यांमध्येच विभागली गेली आहे, हे विशेष होय.
मूळ कारेगावचा परिसर हा पूर्वीसारखा राहिला नसून तो आता खूप विस्तारला गेला आहे. सुमारे दहा ते बारा हजारांपर्यंत येथील लोकसंख्या गेली आहे. सन दोन हजार अकराला येथील जनगणना झाली होती. दुर्दैवाने त्यानंतर अद्याप जनगणना झालीच नाही. परिणामी विस्तारीत लोकसंख्या एक तर मतदार यादीत नोंदली गेली नसावी किंवा नोंदली गेली असली तरी त्याची राज्य शासनाच्या दफ्तरी नोंद झाली नसावी. जनगणना पुन्हा न झाल्यामुळे पूर्वीच्या कारेगावात जी मतदार नोंदीची आकडेवारी आहे, ती सहा-साडे सहा हजार एवढीच काय ते असावी असेच दिसून येत आहे. किंबहुना त्याच आकडेवारीनुसार ग्रामपंचायतच्या विकासासाठी दिला जाणारा विकास निधी दरडोई प्रमाणे शासनाकडून मिळतो असे बोलले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून इच्छा असूनही मूळ गावाच्या लोकसंख्येसह विस्तारीत कारेगावच्या मतदारांसाठी खर्च करणे जिकीरीचे होऊन बसले जाते. सुमारे अकरा वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही पुन्हा जनगणना न झाल्यामुळे नागरी विकास कामांवर कमालीचा त्राण पडला जातो आहे. याची शासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांना तरी शासनाला जागे करावे लागणार आहे, तर आणि तरच खऱ्या अर्थाने विस्तारीत भागासह कारेगावचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल अन्यथा विकासापासून कारेगाव आणि विस्तारीत परिसर आणखी कित्येक वर्षे तसाच अडगळीत पडला जाईल अशी भीतीही वाटणे स्वाभाविक आहे.
ग्राम विकास पॅनेलवर कडवी मात करुन सरपंच पदासह बाराचे बाराही उमेदवार निवडून आणत आप्पाराव पंढरीनाथ वावरे यांनी विजयी आराखडे बांधणाऱ्या विरोधकांचे गणितच खोटे ठरवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाण्यात देव बुडवून बसलेल्या भविष्यकारांचे भविष्यही न भूतो, न भविष्यती जणू अशाच विजयाने ते खोटे ठरविले आहे. मतदारांनी दिलेला कौल शिरसावंद्य मानून विजयी युवा परिवर्तन पॅनेलने सुद्धा मतदारांचा विश्वास सार्थकी लावून आपला गाव नि परिसराचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे ठरणार आहे. परभणी शहराच्या उंबरठ्यावर असलेले हे गाव महापालिकेत जाईल तेव्हा जाईल, परंतु तोपर्यंत तरी भरभरुन विकास करणे हे आपले दायित्व समजणे व विकासाची बांधिलकी जपणे हे परम कर्तव्य ठरणार आहे.
या निवडणूकीत मिळवलेली मतांची आकडेवारी बघून सर्वांनाच धक्का बसला जाणे स्वाभाविक आहे. त्यात सरपंच सौ. पूजा आप्पाराव वावरे – १ हजार ८८५, आप्पाराव पंढरीनाथ वावरे – ६१५, शिवकुमार विष्णू अवचार – ६३१, कांचन अर्जून अवचार – ६०४, सत्यभामा विनायक गांधारे – ३३९, राजाराम बाबुराव वावरे – २९५, रितेश दगडू हानवते – ४६६, लक्ष्मी बालाजी लिंगायत – ४८८, साधना शालीराम अवचार – ४९८, नवनाथ विठ्ठलराव अवचार – ४१३, सखू राजू गांधारे – ४१९ आणि शांताबाई निवृत्ती कुरवारे – ४१८ अशाप्रकारे मिळालेली मते विरोधकांना जबरी धक्का देणारीच असल्याचे जनताच नाही तर पराभूत उमेदवारही बोलत आहेत. हे सारं काहीही असलं तरी कारेगावची ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे स्थानीय पुढाऱ्यांच्या अस्तित्वाचीच लढाई ठरली जाते एवढे नक्की.