
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
परभणी : गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील पोलीस पाटलांना तालुक्याच्या ठिकाणी थांबून आपल्या गावखेड्यांतर्गतचे शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे किंवा आलेल्या नागरिकांसह अधिकारी वर्गाशी चर्चा करणे सोईचे व्हावे यासाठी “पोलीस पाटील भवन” उभारले जाईल अशी घोषणा करुन आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित नागरिक व पोलीस पाटलांना दिलासा दिला आहे.
विधानसभा मतदारसंघात गंगाखेड, पालम आणि पूर्णा असे तीन तालुके समाविष्ट आहेत. तथापि या तीन वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिक, पोलीस पाटील, आमदार आणि शासन स्तरावरील विविध अधिकारी यांचा समन्वय साधणे दूरापास्त व कष्टप्राय असेच होत होते. परिणामी मतदार संघ तीन तालुक्यांमध्ये विस्तारला गेला असल्याने निर्माण अडचणींवर मात करण्यासाठी किंवा त्यातून सुखकर असा मार्ग काढण्यासाठी डॉ.रत्नाकर गुट्टे यांना आमदार म्हणून संपर्क साधणे गैरसोयीचे ठरते होते. त्यामुळे प्रलंबित विधायक प्रश्न मार्गी लावले जाण्यास अधिकच कठीण होऊन बसले होते. याचा सर्वंकष विचार करुन पोलीस पाटील भवन निर्मितीचे स्वप्न साकार केले जावेत अशी संकल्पना आ. गुट्टे यांनी व्यक्त केली.
दरम्यान ही संकल्पना अत्यंत दिलासादायक अशीच असून त्यामुळे तालुका निहाय बैठका व तारखा निश्चित करुन त्या त्या पोलीस पाटील भावनात गावखेड्यातील पोलीस पाटलांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व प्रश्न मार्गी लावणे सुखकर होऊ शकेल. प्रत्येकी रुपये दहा लाख किंवा त्यापेक्षाही अधिक लागणारा निधी उपलब्ध केला जाईल असे आश्वासन आ. गुट्टे यांनी देऊन एका विधायक कार्याला गती देण्याचे महत्प्रयासी काम केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. दरम्यान अशीच भूमिका राज्यातील सर्वच आमदारांनी घेतली तर पोलीस पाटील अधिकार क्षेत्रातील गावखेड्यांचे प्रलंबित सर्व प्रश्न लवकर मार्गी लागू शकतील यात तिळमात्र शंका नसावी.