
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पासून काही अंतरावरील आणि हिंगोली जिल्ह्यातील, औंढा नागनाथ तालुक्यातील प्रसिद्ध अशा जवळा बाजारातून चोरीला गेलेल्या सहा दुचाकीचा छडा लावण्यात हट्टा पोलिसांना यश आले आहे.
दर रविवारी जवळा बाजार येथे मोठा आठवडी बाजार भरला जातो. त्या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन जागा मिळेल तेथे उभे केले जाणाऱ्या दुचाकीवर डल्ला मारण्यासाठी अगोदरच मागावर असलेले भूरटे किंवा सराईत चोर आडोशाला कुठे तरी दबा धरुन लपलेले असतात. त्याचाच परिपाक म्हणून मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारीही वाढीस लागल्या होत्या.
हट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी गजानन बोराटे यांना वाढत्या चोऱ्यांमुळे कमालीची चिंता वाढीस लागली होती. कोणत्याही परिस्थितीत आरोपींच्या मुसक्या आवळायच्याच जणू याच इर्षेने गजानन बोराटे यांनी कंबर कसली होती. त्यांनी बाजाराच्या या भाऊगर्दीत आपल्या विशेष खबऱ्यांमार्फत जाळे तैनात केले होते. त्याशिवाय पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, विभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गजानन बोराटे यांनी सतीष तावडे, भुजंग कोकरे, राजेश ठाकूर, राजेश वळसे, गणेश लेकुरे, प्रफुल्ल लांडे, गणेश वडजे, शेख मदार, अंबादास बेल्हे यांच्या तैनात पथकाने खबऱ्यांच्या मदतीने परंतु शिताफीने मुद्देमालासह चोरांच्या मुसक्या आवळण्यात भरीव यश मिळविले. यातील लिप्त विजय नांगरे आणि त्याचा साथीदार कलाम मुसाखान पठाण, रा. चिकलठाणा
हे फिरत असताना त्यांनी जी दुचाकी जवळ बाळगली होती तिचा तपास केला असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केला असता त्यांच्याकडे आणखी काही चोरीच्या गाड्या मिळून आल्याचे आज सोमवारी प्राप्त अहवालातून आढळून आले. चोरीतील जप्त सहा दुचाकी हट्टा पोलीस चौकीच्या प्रांगणात उभ्या केल्या असून ज्यांच्या ज्यांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यांना योग्य त्या पुराव्यासह घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.