
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इतिहासाचा पाचवा खंड प्रसिद्ध झाला आहे. या खंडामध्ये सन 1997 ते 2008 या 11 वर्षांच्या कालावधीचा समावेश आहे.
या खंडासह, भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास आता 2008 पर्यंत अद्ययावत करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये हा खंड तयार करण्याची प्रक्रिया माजी खासदार आणि रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख सल्लागार आणि मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीच्या स्थापनेद्वारे करण्यात आली. आर्थिक इतिहासकार डॉ. तीर्थंकर रॉय यांच्या नेतृत्वाखालील लेखकांच्या चमूने हा खंड तयार केला आहे. या समितीमध्ये के. कनगसबापथी, एन. गोपालस्वामी, एफ.आर. जोसेफ आणि एस.व्ही.एस. दीक्षित यांचा समावेश होता.
प्रतिकूल परिस्थितीवर मात
नाशिकचे भूमीपुत्र असलेले, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले नामवंत अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मराठी व इंग्रजीतले सिद्धहस्त लेखक तसेच एक प्रसन्न प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. नरेंद्र जाधव सर्वांना सुपरिचित आहेत. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निग्रहाने मात करीत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा चौफेर क्षेत्रात अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक आहे. रसाळ वक्तृत्व शैली, चैतन्यमयी व्यक्तिमत्व, सकारात्मक चिंतनातून प्रबोधन करणारे वक्ते म्हणून डॉ.जाधव यांनी नावलौकिक संपादन केला आहे.